खो-खो प्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट !

  • By admin
  • January 13, 2025
  • 0
  • 126 Views
Spread the love

खो-खो या खेळाचा उगम महाराष्ट्राच्या या मातीतच खऱ्या अर्थाने झाला. ज्येष्ठ सांख्यिकीतज्ञ रमेश वरळीकर यांच्या ‘खो-खो’ या पुस्तकात मांडलेला खालील तर्क पटण्यासारखा आहे. आपला देश हा शेतीप्रधान भारतीय संस्कृतीचा अविष्कार आहे. पिकांनी भरलेली शेती जनावरांनी खराब करु नये म्हणून जे विविध उपाय योजले जात असत. त्यापैकी त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करुन त्यांना पळवून लावणे हा प्रमुख उपाय असे. त्यासाठी शेतात काही ठराविक अंतरावर लहान मुले एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करुन बसवून त्यांना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज (भो-भो) करायला सांगितले जात असावे. असे या शेत (क्षेत्र) रक्षणवृत्तीतून लहान मुलांचा खो-खो खेळ- पळती / पाठलागाचा सुरू झाला असावा.

वरळीकर यांच्या माध्यमातून १९६० ते १९६५ या काळामध्येच महाराष्ट्राने खो-खो जगाला सांख्यिकीचे महत्व पटवून दिले. खो-खो खेळाची आणि खेळाडूंच्या नैपुण्याची सांख्यिक नोंद ठेवण्याचे काम महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने प्रत्यक्षात १९६८ पासून सुरू केले. भारतीय खो-खो क्षेत्रात महाराष्ट्र खो-खो असोसिएशन हीच एकमेव राज्य संघटना आहे कि जिने खो-खो खेळामध्ये सांख्यिकीची उपयुक्तता आणि महत्त्व जाणून प्रत्यक्षात आणले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या सर्वांगीण प्रयत्नामुळे खो-खो हा खेळ आशियाई पातळीवर पोहोचला.

त्यानंतर खो-खोचे आश्रयदाते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल, सरचिटणीस एम एस त्यागी, सहसचिव डॉ चंद्रजित जाधव यांच्या प्रयत्नामुळे खो-खो हा खेळ आता जागतिक स्तरावर पोहोचत आहे. त्याचा थरार नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी स्टेडियमवर पाहायला मिळत आहे.

मुंबईचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू पांडुरंग परब आपल्या आठवणी सांगताना म्हणतात, ‘शाळेत असताना दोन खांबांच्या मध्ये; खांब नसतील तर दोघांना खांब म्हणून उभा करून प्रत्येकाने खेळलेला खेळ म्हणजे खो-खो. २०२५ या नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात खो-खो खेळाचा पहिला विश्वचषक आपल्या भारतात होतोय म्हणून प्रत्येक खो-खो प्रेमीसाठी हे खो-खो वर्ष आहे.

अस्सल लाल मातीतला हा खेळ तहान भूक हरपून मनसोक्त खेळला आहे. हा खेळ अनेकांसाठी खूप आठवणी देणारा, खिलाडुवृत्ती अंगी जोपासायला शिकवणारा. यातील अनेक नियम आयुष्यातील तत्वांशी बांधील आहेत. पळताना कितीही दम लागला तरी आऊट झाल्याशिवाय थांबायच नाही, ही या खेळातील मुख्य गोष्ट धकाधकीच्या आयुष्यात तंतोतंत लागू पडते. फाऊल झाला तर बॅक खो देऊन आपली चूक सुधारायची. जीवनात पण चूक झाली तर त्याचे प्रायश्चित्त भोगून पुन्हा ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हा खेळ शिकवतो.

यात स्वतःला वाचवायचे असेल तर सरळ पळून उपयोग नाही. नागमोडी वळणे घेत, अनेक धोक्यांपासून स्वतःला वाचवून आपले अस्तित्व जिवंत ठेवायला खो-खो सांगतो. जेंव्हा तुमची आक्रमण करण्याची वेळ येते, तेंव्हा तुम्ही नऊ खेळाडू एकत्र येऊन शिकारीच्या मागे लागता. नऊ जणांचे अंतिम ध्येय एकच की शिकार लवकर पकडायची. त्यासाठी एकमेकांची साथ द्यायची. जे उद्दिष्ट एकट्याला साध्य करता येत नाही त्याठिकाणी आपल्या साथीदारांना सोबत घेऊन आयुष्याच्या कठीण प्रसंगात साथ देण्याची वृत्ती इथेच अंगी बाणली जाते. आजही आठवून पहा खो-खो संघातील तुमचे साथीदार फक्त तुमचे साथीदार राहत नाहीत तर ते आयुष्यभरासाठी तुमचे खास होतात.

सामना हरला कोण आणि जिंकला कोण हे निकाल ठरवतो; पण तुम्ही खेळला कसे याची प्रचिती सामना झाल्यावरच येते. जेंव्हा तुम्हाला कोणीतरी येऊन म्हणतो, की ‘काय खेळालाय तू आज’. खेळ म्हणलं की हार जीत आलीच पण मैदान गाजवता आलं पाहिजे हा पहिला सिद्धांत खो-खोने दिला. खांबावर गडी टिपण्याचे कौशल्य म्हणजे आयुष्यात मोक्याच्या क्षणी हुशारीने निर्णय घेऊन कमी वेळात यशाचे शिखर गाठल्यासारखे ! पण ते गाठताना त्यामागे सराव करताना शंभर वेळा त्या खांबावर पडताना हाताची तलवार आणि छातीची ढाल केलेली असते. हवेत झेपावत गडी बाद करणे हे या खेळाचे आकर्षण. जणू आयष्यात काहीच अशक्य नाही हेच धाडस या डाइव्हने दिलेले असते. त्यातून हाता-पायावर झालेल्या जखमा अभिमानाने मिरवताना झालेला आनंद कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नसतो. शेवटी या मैदानावर ज्यांनी आपल्याला खेळायला शिकवले त्यांचे आयुष्यात महत्व अनन्यसाधारण आहे. ते पुढे दिसताच आपले हात कधी त्यांच्या चरणस्पर्शाकडे जातात हे कळतच नाही हे नातं आहे गुरू शिष्याचं !

खो-खो फक्त एक खेळ नसून ती एक भावना आहे. ती अनेकांनी जपली आणि वाढवली आहे. त्याचे मूर्त स्वरूप म्हणजे आता होणारा खो-खो विश्वचषक. आपला खेळ जागतिक पातळीवर खेळला जाणार यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते. माजी खेळाडूंना देखील खो-खो खेळाच्या भावना, आठवणी मनात दाटून आल्या असतील. व्यक्त व्हा कारण आपला खेळ आपला स्वाभिमान !”

  • अजितकुमार संगवे, सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *