
छत्रपती संभाजीनगर :जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेच्या संघाने विजेतेपद पटकावले.
राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आंतरशालेय मुलांची कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून शिवसेना मराठवाडा सचिव अॅड अशोक पटवर्धन, पूर्व शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी तसेच कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अजय पाथ्रीकर, कबड्डी असोसिएशनचे सचिव मार्गदर्शक डॉ माणिक राठोड यांच्यासह सैनिकी शाळेचे प्राचार्य ऋषिकेश पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ हरी कोकरे, एनसीसी विभाग प्रमुख अरुण मुंडे यांची उपस्थिती होती. तसेच बक्षीस वितरण समारंभास अॅड आशुतोष डंक, संस्थेचे सचिव जयप्रकाश गुदगे, शालेय समिती अध्यक्ष सचिन खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते विजयी संघांना रोख पारितोषिक,चषक व प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विजयी संघास व खेळाडूंना अभिनंदन करत पुढील क्रीडा क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १९ संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये शहीद भगतसिंग विद्यालय रांजणगाव, भोंडवे पाटील माध्यमिक विद्यालय वाळूज, डॉ टी पी पाटील विद्यालय खोडेगाव व राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा यांनी अंतिम फेरीत धडक मारली. यामध्ये अंतिम सामना शहीद भगतसिंग विद्यालय रांजणगाव विरुद्ध राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा यांच्यामध्ये अतिशय चुरशीचा सामना रंगला, त्यात सैनिकी शाळेच्या संघाने सामना जिंकून प्रथम पारितोषिक पटकावले. तर शहीद भगतसिंग विद्यालय रांजणगाव यांना दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तृतीय क्रमांक डॉ टी पी पाटील विद्यालय खोडेगाव यांनी पटकावला.
या स्पर्धेत भोंडवे पाटील विद्यालयाचा खेळाडू मानस पटेल यास उत्कृष्ट चढाई तर राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेचा खेळाडू रितेश मगर यास उत्कृष्ट पकड तसेच शहीद भगतसिंग विद्यालय रांजणगाव या संघातील खेळाडू सुदर्शन खंडागळे यास सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले, या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील अंतिम विजयी संघांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय असे रोख पाच हजार, तीन हजार, दोन हजार रुपये तसेच चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सैनिकी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख दत्तात्रय लोखंडे यांच्यासह सखाराम गायके, मनोहर परसे, अनिल जगताप, निर्मलसिंग निकुंभ, विलास खोबरे, सदाशिव काराजंगी, समित देशमुख, वसंत केंद्रे, दादासाहेब काशीद, अजय धाबे, सुरेंद्र शिंदे, शेखर भिंगारे, लक्ष्मण धोत्रे, हेमंत क्षीरसागर, विशाल रगडे, अमोल गिरी, दयानंद सूर्यवंशी व सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कबड्डी असोसिएशनचे योगेश गांगुर्डे, ज्ञानेश्वर सावंत, अल्केश चव्हाण, कृष्णा पवार, योगेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा जैन व वसंत केंद्रे यांनी केले. दत्तात्रय लोखंडे यांनी आभार मानले.