
मुंबई : सिडनी कसोटीत कर्णधार रोहित शर्माला बाहेर बसावे लागले. त्यानंतर भारतीय संघातील वातावरण बिघडले असल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून रंगू लागली. रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याची देखील चर्चा होऊ लागली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या वृत्तांचे खंडन करत रोहित आणि गंभीर यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले.
खराब फॉर्ममुळे भारतीय कर्णधार रोहित शर्माला सिडनी कसोटीतून वगळावे लागले. यानंतर काही माध्यमांच्या वृत्तानुसार गौतम गंभीर आणि हिटमनमध्ये सर्व काही ठीक चालले नाही. तथापि, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे की दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. रोहित आणि गंभीर यांच्यात कोणतेही मतभेद असल्याचे त्यांनी नाकारले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला १-३ ने मालिका गमवावी लागली. या मालिकेत रोहितची कामगिरी खूपच खराब होती. त्यानंतर त्याच्या भविष्याबद्दल अनेक अटकळ बांधली जात होती. या मालिकेत त्याने एकूण तीन सामने खेळले. त्याने पाच डावांमध्ये फक्त ३१ धावा केल्या. एकूणच रोहितची या मालिकेत खूपच खराब कामगिरी झाली.
खराब कामगिरीमुळे रोहित आणि गंभीरमध्ये मतभेद निर्माण झाल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, आता बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी याचा इन्कार केला आहे. राजीव शुक्ला म्हणाले की, ‘हे पूर्णपणे चुकीचे विधान आहे. तसेच निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि प्रशिक्षक यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातही कोणतेही मतभेद नाहीत. हे सर्व मूर्खपणाचे आहे जे माध्यमांच्या एका भागात पसरवले जात आहे.’
सिडनी कसोटीपूर्वी मुख्य प्रशिक्षक गंभीरने अनुभवी खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी अल्टिमेटम दिल्याची अटकळ होती. यावर बोलताना राजीव शुक्ला म्हणाले की, ‘रोहितने कर्णधारपदाचा आग्रह धरला आहे हे देखील चुकीचे आहे. तो कर्णधार आहे. फॉर्ममध्ये असणे किंवा नसणे हा खेळाचा अविभाज्य भाग आहे. हे टप्पे आहेत, यात काही नवीन नाही. जेव्हा त्याला समजले की तो फॉर्ममध्ये नाही तेव्हा त्याने पाचव्या कसोटीतून स्वतःला बाहेर काढले.’
भारतीय संघाची घोषणा कधी होणार?
यावेळी बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल चर्चा केली. आगामी स्पर्धेसाठी संघ रविवारपर्यंत जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, १८-१९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या बैठकीत संघाची निवड केली जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा १८ किंवा १९ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीनंतर केली जाईल.