
शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धा
जालना : कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत जालन्याच्या दीपाली जाधव आणि वैष्णवी सोनटक्के या खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी बजावत सांघिक सुवर्णपदक संपादन केले.
अंतिम सामना महाराष्ट्र आणि कर्नाटक संघात झाला. महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट खेळी करून १ डाव व ४ गुण राखून एकतर्फी विजय मिळविला. महाराष्ट्र संघामध्ये क्रीडा प्रबोधिनीच्या दोन खेळाडू होत्या. दीपाली जाधव आणि वैष्णवी सोनटक्के यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि महाराष्ट्र संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
दीपाली भगवान जाधव व वैष्णवी बळीराम सोनटक्के या खेळाडूंना अमोल चव्हाण व प्रियंका येळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जालना जिल्ह्याच्या इतिहासातच पहिल्यांदाच एका वर्षात दोन राष्ट्रीय सुवर्णपदक मिळविणाऱ्या या पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत. दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळुंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मंगला धुपे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे, प्रशासकीय अधिकारी विनया वडजे, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी प्रभाकर शिंदे, क्रीडा प्रबोधिनीचे व्यवस्थापक प्रमोद खरात, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव चंद्रजीत जाधव, जिल्हा परिषद प्रशाला मुलांची मुख्याध्यापक प्रकाश कुंडलकर जालना जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव रफिक शेख, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, क्रीडा प्रबोधिनीचे प्रशिक्षक रवींद्र ढगे, संतोष मोरे, उषा चव्हाण, वैष्णवी सावरकर व तसेच सर्व जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक यांनी दीपाली जाधव व वैष्णवी सोनटक्के यांचे अभिनंदन केले.