राज्य सरचिटणीस संजय सरदेसाई यांची माहिती
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या ठिकाणी १७ ते १९ जानेवारी या कालावधीत राज्य पॉवरलिफ्टिंग क्लासिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा सब- ज्युनिअर, ज्युनिअर, सीनियर, मास्टर्स (पुरुष /महिला गट) अशी होणार आहे, अशी माहिती राज्य असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांनी दिली आहे. ही स्पर्धा मोहोळ (सोलापूर) येथे सोलापूर जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिग असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे आयोजक विलास बेलदार-संचालक तालीम फिटनेस आहेत. शिव श्याम गुरुकुल, सय्यद वरवडे, तालुका मोहोळ या ठिकाणी स्पर्धा होणार आहे. राज्य स्पर्धा सोलापूर ग्रामीण भागात प्रथमच होत आहे. राज्य संघटनेने सर्व संलग्न असलेल्या जिल्हा असोसिएशनला परिपत्रक पाठविले आहे. सर्व खेळाडू, पदाधिकारी आणि पंच यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संजय सरदेसाई यांनी केले आहे.