दोन दशकांनंतर पुण्यात आंतरराष्ट्रीय ज्युदो खेळाडूंचा थरार !

  • By admin
  • January 15, 2025
  • 0
  • 547 Views
Spread the love

पुनीत बालन ग्रुप आणि इन्स्पायर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, राज्य ज्युदो संघटनेतर्फे आयोजन 

पुणे : दोन दशकांच्या (२० वर्षांनंतर) कालावधीनंतर महाराष्ट्रात खुल्या सबज्युनियर आणि कॅडेट अशा दोन राष्ट्रीय ज्युदो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील ज्युदोप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे. पुनित बालन ग्रुप आणि इन्स्पायर स्पोटर्स इन्स्टिट्यूट प्रस्तुत या स्पर्धेत ३० राज्यांमधील सुमारे १२०० ज्युदोपटू सहभागी होणार आहेत.

पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांनी सांगितले की, ज्युदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली सब-ज्युनियर आणि कॅडेट गटातील ही स्पर्धा बालेवाडी-म्हाळूंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल येथे १७ ते २४ जानेवारी या कालावधीमध्ये होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन बेल्लारी येथील इन्स्पायर स्पोटर्स इन्स्टिट्यूट आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या सहकार्याने तसेच पुण्यातील युवा उद्योजक आणि महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे प्रमुख आधारस्तंभ पुनीत बालन यांच्या आर्थिक मदतीने करण्यात आलेले आहे. पत्रकार परिषदेमध्ये संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले आणि तांत्रिक समिती सचिव दत्ता आफळे हे उपस्थित होते.

महाराष्ट्र अ आणि ब अशा दोन संघांसह पंजाब, दिल्ली, हरियाणा, केरळ, पॉन्डेचरी, मध्य प्रदेश, गुजरात अशा देशातील ३० राज्यांतील जवळपास १२०० ज्युदोपटू सहभागी होणार आहेत. यामध्ये सब ज्युनिअर्स (१५ वर्षाखालील) गटामध्ये ६०० मुले आणि मुली तर कॅडेट (१५ ते १८ वर्षाखालील) गटामध्ये ६०० मुले आणि मुली सहभागी होणार आहेत. सब ज्युनियर गटामध्ये ९ मुली आणि ९ मुलांचे वजन गट असून कॅडेट गटामध्ये ८ मुली आणि ८ मुले वजन गट असणार आहेत. याशिवाय प्रत्येक संघासोबत प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि पदाधिकारी या स्पर्धेनिमित्त पुणे शहरामध्ये येणार आहेत. स्पर्धेसाठी ६० तज्ञ पंचांची नियुक्ती ज्युदो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे करण्यात आलेली असून ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पंचांचाही सहभाग असणार आहे.

विनय आचार्य आणि तानिया राठोड (राजस्थान), संयम चौधरी (चंडीगड), मैतेयी, बिपिलीया आणि ओलीव्हिया देवी (मणिपूर) अशा नामांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

सब-ज्युनियर गटाच्या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (१९ जानेवारी) सकाळी ९.३० वाजता केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार असून यावेळी उद्योजक पुनीत बालन आणि आयआयएसचे प्रतिनिधी तथागत मुखर्जी हे मान्यवर उपस्थित असणार आहेत. 

सब-ज्युनिअर स्पर्धा १९ आणि २० जानेवारी या दोन दिवशी तीन मॅट एरियावर घेण्यात येणार आहेत. कॅडेट गट स्पर्धेचे उद्घाटन २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह आयआयएसच्या अध्यक्षा मनीषा मल्होत्रा आणि पुनीत बालन उपस्थित असणार आहेत. या स्पर्धा २३ आणि २४ जानेवारी दरम्यान होणार आहे.

या स्पर्धांच्या कार्यक्रमा दरम्यान क्रीडा क्षेत्रातील मान्यवर ऑलिम्पिक खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेते स्वप्नील कुसाळे, सचिन खिलारे, अंजली भागवत आदींना आमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *