
व्हेरॉक औद्योगिक क्रिकेट स्पर्धा : स्वप्नील चव्हाण, सचिन हातोळे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : १८व्या व्हेरॉक करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यांमध्ये महावितरण आणि श्रुती इंडस्ट्रीज या संघांनी दणदणीत विजयासह आगेकूच केली. या सामन्यांमध्ये स्वप्नील चव्हाण आणि सचिन हातोळे यांनी सामनावीर किताब पटकावला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या लढतीत महावितरण संघाने सार्वजनिक बांधकाम विभाग संघावर नऊ विकेट राखून मोठा विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सार्वजनिक बांधकाम विभाग संघाने २० षटकात नऊ बाद १३५ धावा काढल्या. महावितरण संघाने १३.३ षटकात एक बाद १३६ धावा फटकावत नऊ विकेटने सामना जिंकला.
या लढतीत स्वप्नील चव्हाण (६१), राहुल शर्मा (५९), नीरज देशपांडे (३०) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत स्वप्नील चव्हाण याने १६ धावांत तीन विकेट घेत सामना गाजवला. अनिल राठोड (२-२३) व प्रदीप चव्हाण (२-२८) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात श्रुती इंडस्ट्रीज संघाने गुड ईयर संघाचा १३६ धावांनी पराभव केला. या सामन्यात श्रुती इंडस्ट्रीज संघाने २० षटकात पाच बाद २०४ अशी भक्कम धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात गुड ईयर संघ १५.४ षटकात नऊ बाद ६८ धावा काढू शकला. श्रुती इंडस्ट्रीज संघाने १३६ धावांनी सामना जिंकला.
या लढतीत नितीन चव्हाण (५२), मोहम्मद इम्रान (४४), सचिन हातोळे (३०) यांनी धमाकेदार फलंदाजी केली. गोलंदाजीत सचिन हातोळे (३-५), आशिष गवळी (२-१०) आणि नितीन चव्हाण (२-११) यांनी प्रभावी स्पेल टाकला.
संक्षिप्त धावफलक : १) सार्वजनिक बांधकाम विभाग : २० षटकात नऊ बाद १३५ (शैलेश सूर्यवंशी १६, अमित पाठक १७, नीरज देशपांडे ३०, योगेश राठी ९, राजेश ढोरमारे १२, अजिंक्य दाभाडे ११, प्रवीण गवळी नाबाद २३, स्वप्नील चव्हाण ३-१६, अनिल राठोड २-२३, प्रदीप चव्हाण २-२८, विशाल घायाळ १-२१, कैलास शेळके १-३५) पराभूत विरुद्ध महावितरण : १३.३ षटकात एक बाद १३६ (राहुल शर्मा नाबाद ५९, स्वप्नील चव्हाण नाबाद ६१, पांडुरंग धांडे ६, राहुल सोनवणे १-२२). सामनावीर : स्वप्नील चव्हाण.
२) श्रुती इंडस्ट्रीज : २० षटकात पाच बाद २०४ (आशिष गवळी ८, अशोक शिंदे २७, नितीन चव्हाण ५२, रमेश साळुंके १६, मोहम्मद इम्रान ४४, सचिन हातोळे नाबाद ३०, भगवान नरवडे नाबाद ७, इतर २०, सागर दुबे २-३६, जितेंद्र निकम २-४६, योगेश पाटील १-१७) विजयी विरुद्ध गुड ईयर : १५.४ षटकात नऊ बाद ६८ (जितेंद्र निकम १८, सुनील जाधव १४, कृष्णा सातपुते ६, भूषण नवले ९, सचिन हातोळे ३-५, नितीन चव्हाण २-११, आशिष गवळी २-१०, मोहम्मद इम्रान १-१५, रंभू गाडगुळ १-७). सामनावीर : सचिन हातोळे.