
सलग दुसऱया सामन्यात भारतीय संघाचे गुणांचे शतक, कर्णधार प्रियंका इंगळे सर्वोत्तम खेळाडू
बाळासाहेब तोरसकर
नवी दिल्ली : इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने दुसऱ्या सामन्यात धमाकेदार कामगिरी नोंदवत इराण संघाला अक्षरशः लोळवले. दक्षिण कोरियाविरुद्धच्या ऐतिहासिक १७५-१८ अशा विजयानंतर भारतीय महिला खो-खो संघाने इराणला ८४ गुणांनी पराभूत करत गटात अव्वल स्थान मिळवले. या विजयाने भारतीय संघाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
पत्रकार परिषदेत भारताची कर्णधार प्रियंका इंगळे हिने यापुढेही भारतीय संघ गुणांची उधळण करेल असे सांगितले होते. आम्हाला फक्त जिंकायचे नसून खो-खो खेळात जगावर निर्विवाद वर्चस्व निर्माण करायचे आहे असे कर्णधाराने सांगितले. या सामन्यात भारतीय खो-खो खेळाडूंनी इराणच्या खेळाडूंना पळता भुई थोडी केली. कर्णधार प्रियांकाला १७५ गुणांबद्दल विचारले होते त्यावर तिने व्यक्त केलेले वाक्य खरे करत याहि सामन्यात भारताच्या खेळाडूंनी गुणांची शंभरी गाठली. त्यापूर्वी भारतीय संघाने मध्यंतराला ५२-१० अशी घसघशीत आघाडी घेत विजयी घोडदौड कुठेही थांबणार नाही याची काळजी घेतली. बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी १००-१६ असा मोठा विजय मिळवला. या कामगिरीने त्यांना गटात अव्वल स्थान मिळवून दिले आहे.
सामन्याची सुरुवात भारतीय संघाच्या नेहमीच्या आक्रमक शैलीने झाली. पहिल्या टर्नमध्ये त्यांनी इराणच्या पहिल्या बॅचला अवघ्या ३३ सेकंदांत बाद केले. अश्विनी हिने आघाडी घेत संघासाठी सुरुवातीला गुण मिळवले, तर मीनूने आपला शानदार फॉर्म कायम राखत अनेक सहज स्पर्शाने गुण मिळवले. पहिल्या टर्नमध्येच भारतीय संघाने ५० गुणांची कमाई केली.
सामना पुढेही एकतर्फी राहिला. तिसऱ्या टर्नच्या शेवटी भारताचे ९३ गुण झाले होते व शेवटच्या टर्न मध्ये ७ ड्रीम रन वसूल करत भारताने गुणांची शंभरी गाठली. वझीर निर्मलाच्या डावपेचांच्या कौशल्याने आणि कर्णधार प्रियंका इंगळे, निर्मला भाटी आणि नसरीन यांच्या योगदानामुळे भारताने आणखी एक प्रभावी व मोठा विजय साजरा केला. या विजयामुळे भारताने या स्पर्धेतील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.
सामन्यातील पुरस्कार
सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू : मोबिना (इराण)
सर्वोत्कृष्ट बचावपटू : मीनू (भारत)
सामन्याची उत्कृष्ट खेळाडू : प्रियांका इंगळे (कर्णधार, भारत)
केनिया संघाचा ऑस्ट्रेलियावर निसटता विजय
पुरुष गटातील एका चुरशीच्या सामन्यात केनियाने ऑस्ट्रेलियावर ५८-५४ अशी मात केली. मध्यंतरास ऑस्ट्रेलियाने केनियावर २८-२६ असे निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र केनियाने बहारदार खेळी करीत संघाचा विजय खेचून आणला. किनियाचा मोसेस अटेन्या (१.२३ मि. संरक्षण व १४ गुण ) याने अष्टपैलू खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा मंगेश जगताप आक्रमक पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने यात १२ गडी टिपले. सकाळी झालेल्या सामन्यात मंगेशने जर्मनी विरुद्धही आक्रमकचा पुरस्कार आणि इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडूचा मान मिळविला होता.
इतर सामन्यांचे निकाल
पुरुष गट : इंग्लंड विजयी विरुद्ध मलेशिया ५२-३२.
महिला गट : न्युझीलंड विजयी विरुद्ध पेरू ६६-२६. भूतान विजयी विरुद्ध जर्मनी ६६-२२. दक्षिण आफ्रिका विजयी पोलंड ७८-२. नेपाळ विजयी विरुद्ध जर्मनी ७३-३४.