
भारताचा ३२ गुणांनी विजय, अनिकेत पोटे, रामजी कश्यप चमकले
बाळासाहेब तोरसकर
नवी दिल्ली : पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने आपला विजयरथ कायम ठेवला आहे. या सामन्यात भारताने पेरूचा ७०-३८ असा ३२ गुणांनी धुव्वा उडवला. अनिकेत पोटे याने सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू हा बहुमान संपादन केला.
पेरू संघाने पहिल्या डावात १६ तर दुसऱ्या डावात २२ गुणांची कमी करत सामन्यात थोडीफार रंगत भरली. मध्यंतराला भारताने ३६-१६ अशी २० गुणांची आघाडी घेत आपले विजयाचे इरादे स्पष्ट केले होते व ३२ गुणांनी विजय मिळवत त्यावर शिक्कामोर्तब केले व उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले. या सामन्यात अनिकेत पोटेला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सामन्यात रामजी कश्यपने देखील मोठे योगदान देत विजयात मोलाचा वाटा उचलला.
पहिल्या टर्नमध्ये भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करत सामन्यावर नियंत्रण मिळवले. पेरूने दुसऱ्या टर्नमध्ये थोडा प्रतिकार केला, पण कर्णधार वझीर प्रतीक वाईकरच्या नेतृत्वाखाली भारताने आपली आघाडी कायम ठेवत पहिल्या फेरीत ३६ गुणांची कमाई केली. दुसऱ्या टर्नमध्ये आदित्य पोटे, शिवा रेड्डी आणि सचिन भार्गो यांनी चमकदार खेळ करून भारताचा दबदबा वाढवत नेला. तिसऱ्या आणि चौथ्या टर्नमध्ये भारतीय संघाने आपला खेळ उंचावत ७० गुणांची कमाई केली.