
मुंबई : भारतीय संघाने तब्बल १० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात मालिका गमावली. या पराभवानंतर भारतीय संघ आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागली. भारतीय संघातील फूट पडल्याची बातमी समोर येत आहे. खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील चर्चा बाहेर पडण्यासाठी सरफराज खान याला जबाबदार धरण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय संघातील सरफराजचे स्थान धोक्यात आले आहे.
अलीकडेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील चर्चा त्यांच्यापुरती मर्यादित राहिली तर ते संघाच्या वातावरणासाठी चांगले होईल असे सांगितले आहे. तसेच, भारतात परतल्यानंतर भारतीय मुख्य प्रशिक्षकांनी या सर्व गोष्टींबाबत बीसीसीआयसोबत आढावा बैठक घेतली.
भारतीय संघाचा युवा फलंदाज सरफराज खानवर एक मोठा आरोप करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार गौतम गंभीरने सरफराज खानवर आरोप केले आहेत. त्यामध्ये असे म्हटले आहे की सरफराज खानने ड्रेसिंग रूमच्या सर्व बाबी लीक केल्या. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच मुख्य प्रशिक्षक गौतम आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत निषेधांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या वृत्तांमध्ये असे म्हटले आहे की, सरफराज खान ड्रेसिंग रूमच्या बाबी बाहेरील माध्यमांसोबत शेअर करत होता.
मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंना कडक शब्दांत फटकारले होते. यावेळी, गौतम गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये चांगला धडा दिला. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की भारतीय संघातील एक खेळाडू जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्याच्या बाजूने नव्हता. हा खेळाडू स्वतःला अंतरिम कर्णधार म्हणून सादर करत होता. तथापि, या खेळाडूचे नाव उघड करण्यात आले नाही. पण विराट कोहलीला हा खेळाडू मानले जात होते. तथापि, आतापर्यंत गौतम गंभीरने त्यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा सादर केलेला नाही.