
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तिकिटांची किंमत केली निश्चित
नवी दिल्ली : पाकिस्तानची आर्थिक स्थिती कोणापासूनही लपलेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निश्चित केलेल्या तिकिटांच्या किमतींमध्ये याची झलक दिसून आली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी चॅम्पियन्स स्पर्धेसाठी तिकिटांची किंमत एक हजार पाकिस्तानी रुपये निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, भारतीय चलनात तिकिटाची किंमत फक्त ३१० रुपये इतकी आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या देशात होणाऱ्या सामन्यांसाठी तिकिटांची किंमत निश्चित केल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. तिकिटाची किमान किंमत एक हजार रुपये पाकिस्तानी रुपये ठेवण्यात आली आहे. तथापि, दुबईमध्ये होणाऱ्या भारताच्या सामन्यांसाठी तिकिटांचे दर काय असतील हे सांगण्यात आलेले नाही.
पीटीआयने दावा केला आहे की त्यांच्याकडे एक कागदपत्र आहे. त्यामध्ये आगामी स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे तिकिटांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. कागदपत्रानुसार, पीसीबीने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होणाऱ्या सामन्यांसाठी तिकिटांची किमान किंमत १००० पाकिस्तानी रुपये ठेवली आहे. रावळपिंडी येथे होणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेश सामन्यांच्या तिकिटांची किंमत पाकिस्तानी रुपये २००० (भारतीय रुपये ६२०) आणि उपांत्य फेरीच्या तिकिटांची किंमत पाकिस्तानी रुपये २५०० (भारतीय रुपये ७७६) असेल.
पीसीबीने सर्व सामन्यांसाठी व्हीव्हीआयपी तिकिटांची किंमत पाकिस्तानी रुपये १२,००० (भारतीय रुपये ३,७२६) ठेवली आहे. परंतु उपांत्य फेरीसाठी त्यांची किंमत २५,००० (भारतीय रुपये ७,७६४) असेल. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यासाठी कराचीमधील प्रीमियर गॅलरीचे तिकिट पाकिस्तानी रुपये ३५०० (भारतीय रुपये १०८६), लाहोरमध्ये ५००० (भारतीय रुपये १५५०) आणि रावळपिंडीमध्ये ७००० (भारतीय रुपये २१७०) आहे.
पीसीबीला कराचीमध्ये व्हीआयपी गॅलरी तिकिटे ७,००० रुपये, लाहोरमध्ये ७,५०० रुपये आणि बांगलादेश सामन्यासाठी १२,५०० रुपये ठेवायची आहेत. सर्वसामान्यांसाठी १८,००० तिकिटे उपलब्ध असतील परंतु एका वेळी एखादी व्यक्ती किती तिकिटे खरेदी करू शकते आणि तिकिटे ऑनलाइन उपलब्ध असतील की नाही हे निश्चित केलेले नाही.
‘पीसीबी’ला आयसीसीकडून अपेक्षा
आयसीसी स्पर्धेच्या नियमांनुसार यजमान देश सामन्यांची तिकीट विकतो आणि त्यापासून आणि हॉस्पिटॅलिटी बॉक्समधून मिळणारा महसूल स्वतःकडे ठेवतो. याशिवाय, त्याला आयसीसीकडून होस्टिंग फी देखील मिळते. भारताचे सामने दुबईमध्ये होणार आहेत, त्यामुळे पीसीबीला वाटते की त्यांना तिकिटे आणि हॉस्पिटॅलिटी बॉक्समधून पैसे मिळतील. एमिरेट्स क्रिकेट बोर्डाला मैदानाचे भाडे समाविष्ट करून ऑपरेटिंग खर्च दिला जाईल.