
अजितकुमार संगवे

नवी दिल्ली : मी लहानपणापासून ‘पोल डाइव्ह’ म्हणजे पोलवर गडी टिपण्याचे तंत्र विकसित करत आलो आहे. काहीजण म्हणायचे, ‘काय पोल डाइव्ह, पोल डाइव्ह करतो,’ परंतु ‘पोल डाइव्ह’ ही माझी ओळख आहे. आज मला खो-खो क्षेत्रात ‘पोल डाइव्ह किंग’ म्हणून ओळखतात. मला ती ओळख वाढवायची आहे आणि त्यात नाव कमवायचे आहे, हे मुंबई उपनगरच्या अनिकेत भगवान पोटे याचे ध्येय आहे.
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताकडून प्रतिनिधित्व करीत असलेल्या अनिकेतने पेरू विरुद्धच्या सामन्यात सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा मान मिळवला. यावेळी तो बोलत होता.
खो-खो खेळाकडे कसे वळाला हे सांगताना अनिकेत म्हणतो, ‘मी शाळेत क्रीडा महोत्सवामध्ये सर्व खेळांमध्ये अव्वल खेळाडू होतो. आमच्या शाळेतील जोशी सर यांनी मला खो-खो खेळण्यास सांगितले. सुरुवातीला खेळात जास्त रस नव्हता. परंतु तेव्हा मंगेश गराटे हे दोन-तीन वेळा मला घरी येऊन सरावासाठी घेऊन जायचे. त्यामुळे यात रमलो.’
कामगिरी कशी-कशी बहरत गेली यावर बोलताना अनिकेत म्हणाला, ‘२००८ मध्ये मी पहिली १४ वर्षांखालील राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा खेळलो. त्यानंतर मी २० राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. २०१६ मध्ये झालेल्या पहिल्या साउथ एशियन चॅम्पियनशिपमध्ये ‘स्टार ऑफ द टुर्नामेंट’ हा पुरस्कार मिळाला. २०१८ मध्ये भारत-इंग्लंड टूर केली. २०२३ मध्ये चौथी एशियन चॅम्पियनशिप खेळलो. २०१५-१६ मध्ये महाराष्ट्र शासनाचा जिल्हा क्रीडा पुस्कार व २०१७-१८मध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचा मानकरी ठरलो. राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमकाचा ३ व २ वेळा सरंक्षकाचा पुरस्कार मिळाला. २०२२च्या अल्टिमेट खो-खो लीगमध्ये तिसरा क्रमांक मिळाला. या कामगिरीवर मला महाराष्ट्र शासनाने वर्ग २ स्पोर्ट्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून थेट नियुक्ती दिली आहे.’
डॉ नरेंद्र कुंदर हे अनिकेतचे मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर शेखर पाटील, आकाश पाटील, सुहास जोशी, मंगेश गराटे, विशाल चव्हाण, अनिल पिसाळ, सचिन साळुंके, चेतन गवस, दीपेश मोरे, प्रशांत पवार या सर्वांचा मला घडवण्याचा सहभाग आहे, असे अनिकेतने सांगितले.
टीव्ही मध्ये पाहण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण
अल्टिमेट लीगचा पहिला सामना पहायला माझा परिवार आलेला होता. त्याच पहिल्या सामन्यामध्ये मला ‘अल्टिमेट खो-खो ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द मॅच’ असे दोन पुरस्कार मिळाले. अल्टिमेट लीगनंतर आता सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्येही सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. हे दोन्ही क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय व आनंदाचे. कारण नॅशनल टेलीव्हीजनवर खो-खोचे सामने होण्याची पहिलीच वेळ होती आणि हेच माझ्या वडिलांचं स्वप्न होते की त्यांना मला नॅशनल टेलिव्हिजनवर खेळताना लाईव्ह पहायचे होते. माझे वडील कॅन्सरग्रस्त होते. त्यातून ते दगावले. ते जरी आता माझ्या सोबत नसले तरी ते मला खेळताना पाहून खूश होत असतील आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम आहे. त्यामुळे टीव्ही मध्ये पाहण्याचे माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा मला आनंद आहे.
आतापर्यंतची कामगिरी
- राज्य स्पर्धा : १६ (९ सुवर्ण,१ रौप्य ,६ कांस्य)
- राष्ट्रीय स्पर्धा : १६ (८ सुवर्ण,६ रौप्य)
- अखिल भारतीय विद्यापीठ : ४ (२ सुवर्ण,१ रौप्य,१ कांस्य)
- आंतरराष्ट्रीय स्पर्धा : ५ (३ सुवर्ण, १ रौप्य).