
राजकोट : आयर्लंड संघाविरुद्ध भारतीय महिला संघाने विक्रमी कामगिरी नोंदवत मालिका ३-० अशी जिंकली. या शानदार कामगिरीनंतर कर्णधार स्मृती मानधना हिने यावर्षी एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल असे सांगत संघाचे मनोबल वाढवले.
स्मृती मानधनाचा असा विश्वास आहे की वेस्ट इंडिज आणि आयर्लंडवरील ३-० असा मालिका विजय हा यावर्षीच्या ५० षटकांच्या विश्वचषकासाठी एक उत्तम तयारी आहे. मानधनाने म्हटले आहे की तिच्या संघाला हे वर्ष एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम वर्ष बनवायचे आहे. आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत मानधनाने भारतीय संघाचे नेतृत्व केले. या मालिकेत भारतीय संघाने अनेक विक्रम केले. त्यामध्ये पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा सर्वोत्तम एकूण धावसंख्या समाविष्ट आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषक यावर्षी भारतात होणार आहे आणि स्मृती मानधनाचा असा विश्वास आहे की सलग सहा एकदिवसीय सामने जिंकल्यानंतर, तिच्या संघाला आता घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळू शकेल. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणाल्या की, ‘विश्वचषक वर्षात ३-० असा विजय खास आहे. आपल्याला ही गती कायम ठेवायची आहे आणि हे वर्ष एकदिवसीय सामन्यांमधील आपले सर्वोत्तम वर्ष बनवायचे आहे.’
स्मृती मानधना (१३५) आणि प्रतिका रावल (१५४) यांच्यातील २३३ धावांच्या सलामी भागीदारीच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील त्यांची सर्वोच्च धावसंख्या, पाच बाद ४३५ धावा केल्या आणि ३०४ धावांनी विजय मिळवला. मानधना म्हणाली, ‘मला मोकळेपणाने फलंदाजी करायची होती. मी डगआउटमध्ये असेही म्हटले होते की मी माझे शॉट्स खेळेन कारण मला दरवेळी असे खेळण्याची संधी मिळत नाही.’
त्याच वेळी, प्रतिका रावलने कबूल केले की जेव्हा ती शतक करण्याच्या जवळ होती तेव्हा ती थोडी मंदावली होती. परंतु शतक पूर्ण केल्यानंतर तिने जलद फलंदाजी करण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, ‘मला नेहमीच खूप धावा करायच्या असतात आणि देशासाठी खेळताना असे करणे अभिमानाची गोष्ट आहे.’ ७० धावा काढल्यानंतर मी थोडे सावधपणे खेळत होते, पण शतक पूर्ण केल्यानंतर मी मोकळेपणाने खेळायला सुरुवात केली.’