
महाराष्ट्राचा ६९ धावांनी पराभव, अर्शीन कुलकर्णी, अंकित बावणेची झुंज
वडोदरा ः ध्रुव शोरे (११४) आणि यश राठोड (११६) यांच्या आक्रमक शतकांच्या बळावर विदर्भ संघाने दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र संघाचा ६९ धावांनी पराभव करुन विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अर्शीन कुलकर्णी (९०) व अंकित बावणे (५०) यांनी जोरदार झुंज दिली. विदर्भ संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहचला आहे.
कोटांबी स्टेडियमवर विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यात सामना झाला. महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय महाराष्ट्राला प्रचंड महागात पडला. फलंदाजीला मदत करणाऱ्या खेळपट्टीचा विदर्भ संघाने मोठा फायदा उठवत ५० षटकात तीन बाद ३८० असा धावांचा डोंगर उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले.

विदर्भ संघाच्या ध्रुव शोरे व यश राठोड या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात करत धावगती कायम ठेवत तब्बल २२४ धावांची भागीदारी केली. ध्रुव व यश जोडीने शतकांसह ३४.४ षटकात २२४ धावांची भागीदारी करुन संघाला सामन्यावर वर्चस्व गाजवण्याची संधी मिळवून दिली. ३५व्या षटकात यश राठोडची आक्रमक खेळी संपुष्टात आली. यश याने १०१ चेंडूत ११६ धावांची खेळी केली. सत्यजित बच्छाव याने त्याला क्लीन बोल्ड बाद केले. यशने एक षटकार व चौदा चौकार मारले. त्यानंतर ध्रुव शोरे ११४ धावांची धमाकेदार खेळी करुन बाद झाला. त्याला मुकेश चौधरी याने बाद केले. ध्रुव याने आपल्या आक्रमक शतकात एक षटकार व चौदा चौकार ठोकले.
ध्रुव व यश हे दोघे शतकवीर बाद झाल्यानंतर कर्णधार करुण नायर व जितेश शर्मा या जोडीने वादळी फलंदाजी केली. करुण नायर या हंगामात प्रचंड फॉर्मात आहे. करुण नायर याने ४४ चेंडूत नाबाद ८८ धावांची तुफानी खेळी करत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपली दावेदारी अधिक भक्कम केली. नायरने पाच टोलेजंग षटकार व नऊ चौकार मारले. जितेश शर्मा याने ३३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. जितेशने तीन उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. शुभम दुबे ५ धावांवर नाबाद राहिला.

महाराष्ट्र संघाकडून मुकेश चौधरी याने दोन विकेट घेतल्या. परंतु, त्याने त्यासाठी तब्बल ८० धावा मोजल्या. सत्यजीत बच्छाव याने एक विकेटसाटी ६० धावा दिल्या. अन्य गोलंदाज प्रचंड महागडे ठरले. त्यामुळे विदर्भ संघ ५० षटकात तीन बाद ३८० असा धावांचा डोंगर उभारण्यात यशस्वी ठरला.
महाराष्ट्र संघासमोर विजयासाठी ३८१ धावांचे आव्हान होते. महाराष्ट्र संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रुतुराज गायकवाड अवघ्या ७ धावांवर बाद झाला. दर्शन नळकांडे याने रुतुराजची विकेट घेऊन महाराष्ट्र संघाला मोठा धक्का दिला. त्यानंतर अर्शीन कुलकर्णी व राहुल त्रिपाठी या जोडीने ४१ धावांची भागीदारी केली. राहुल त्रिपाठी १९ चेंडूत २७ धावा काढून बाद झाला. त्याने चार चौकार व एक षटकार मारला. त्यानंतर २३व्या षटकात महाराष्ट्र संघाला तिसरा धक्का बसला. सिद्धेश वीर ३० धावांवर बाद झाला. त्याने एक षटकार मारला.
एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना सलामीवीर अर्शीन कुलकर्णी याने ९० धावांची खेळी करत सामन्यातील रोमांच कायम ठेवला. अनुभवी अंकित बावणे याने आक्रमक फटकेबाजी करत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. अर्शीन आणि अंकित या जोडीने चौथ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. ही जोडी सुरेख खेळत असताना अर्शीन ९० धावांवर बाद झाला. त्याने एक षटकार व आठ चौकार मारले. अंकित बावणे (५०) अर्धशतकानंतर लगेच बाद झाला. दर्शन नळकांडे याने अंकितला बाद करुन सामन्यातील तिसरा बळी मिळवला.
अजीम काझी (२९), निखिल नाईक (४९), सत्यजीत बच्छाव (नाबाद २०) यांनी अखेरपर्यंत झुंज दिली. महाराष्ट्र संघाने ५० षटकात सात बाद ३११ धावा काढल्या. विदर्भ संघाने ६९ धावांनी सामना जिंकला. दर्शन नळकांडे (३-६४), नचिकेत भुते (३-६८) यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. आता विदर्भ आणि कर्नाटक यांच्यात अंतिम सामना होणार आहे.