
काँग्रेसचे क्रीडा विभाग प्रदेश सरचिटणीस प्रा जयपाल रेड्डी यांची क्रीडा आयुक्तांकडे मागणी
नांदेड : छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल समितीचा घोटाळा २१ कोटींचा नसून सुमारे १०० कोटींचा आहे. यात अधिकारी वर्गाचा सहभाग आहे. त्यामुळे या घोटाळ्याची कसून चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे युवक व क्रीडा विभागाचे प्रदेश सरचिटणीस प्रा जयपाल रेड्डी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
प्रा जयपाल रेड्डी यांनी क्रीडा आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘विभागीय क्रीडा संकुल समितीचा हा घोटाळा २१ कोटींचा नसून त्यापेक्षा अधिक आहे. हा घोटाळा १०० कोटींपेक्षा अधिक आहे. गेल्या पाच वर्षांत तत्कालीन क्रीडा उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी व कर्मचारी यांचा यात सहभाग दिसून येत आहे. त्या अनुषंगाने मागील पंचवार्षिक कालावधीत जे अधिकारी कार्यरत होते त्यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. तसेच त्यांच्या नातेवाईकांची देखील मालमत्ता संदर्भात चौकशी करावी.’
या घोटाळा प्रकरणी कंत्राटदार लिपीक हर्ष क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात संजय सबनीस यांची चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या पाच वर्षांत मालमत्तेची खरेदी-विक्री काय काय झाली, त्यांचे बँक खाते याची सर्वंकष चौकशी करावी. तसेच त्यांच्या नातेवाईकांची देखील चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रा जयपाल रेड्डी यांनी आपल्या निवेदननात म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांपासून विभागीय क्रीडा संकुलात प्रशिक्षण शुल्काची जादा दराने आकारणी सुरू आहे. ही सुविधा खेळाडूंसाठी मोफत करण्यात यावी. पालकांकडून अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने क्रीडा आयुक्तांनी प्रशिक्षण शुल्क तसेच या घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कार्यवाही करावी. अन्यथा काँग्रेस क्रीडा व युवकतर्फे लोकशाही पद्धतीने १० फेब्रुवारीपासून आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रा जयपाल रेड्डी यांनी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. या लेखी निवेदनाच्या प्रती त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडा मंत्री, काँग्रेस क्रीडा व युवक विभाग प्रमुख समीता गोरे, राज्य समन्वयक कुमार कुर्तडीकर, पुणे जिल्हाधिकारी, बानेर पोलिस निरीक्षक यांना पाठवल्या आहेत.