
चिंतामणी चषक कबड्डी स्पर्धा
मुंबई : लायन्स स्पोर्टस्, विजय क्लब, शिवशक्ती क्रीडा या संघांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या सातव्या चिंतामणी चषक कबड्डी स्पर्धेच्या प्रथम श्रेणी पुरुष गटात, तर हिंदमाता सेवा, वीर संताजी क्रीडा, शिवनेरी सेवा यांनी कुमार गटात विजयी सलामी दिली.
मुंबई येथील चिंचपोकळी लोहमार्ग स्थानक जवळील सदगुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणावर झालेल्या प्रथम श्रेणी पुरुषांच्या उद्घाटनीय सामन्यात लायन्स स्पोर्ट्स संघाने सूर्यकांत व्यायाम शाळेचा प्रतिकार २७-२१ असा मोडून काढला. हर्ष मोरे, शुभम मटकर, यश सायगावकर यांच्या चढाई-पकडीच्या खेळाच्या जोरावर पूर्वार्धात लोण देत १६-०५ अशी भक्कम आघाडी लायन्सने घेतली. उत्तरार्धात सूर्यकांतच्या साहिल तूपारे, मंदार ठोंबरे यांनी आपला खेळ गतिमान करीत लायन्स संघावर लोण देत ही आघाडी कमी केली. पण वेळेचे गणित साधता न आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सामन्यात विजय क्लबने साऊथ कॅनरा स्पोर्ट्स संघाचा ३२-२२ असा पाडाव केला. विश्रांतीला १७-०९ अशी विजय क्लबकडे आघाडी होती. रोहन तिवारी, निखिल शेट्टी यांच्या दमदार चढाया त्याला शुभम रहाटे, आयुष साळवी यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले. साऊथ कॅनराच्या अमन शेख, करण गरजे यांनी विश्रांतीनंतर बऱ्यापैकी लढत दिली.
याच गटात शिवशक्ती क्रीडा मंडळाने चुरशीच्या लढतीत विजय नवनाथचे आव्हान ३७-३३ असे संपविले. हाफ टाइमला १६-११ अशी शिवशक्ती संघाकडे आघाडी होती. साई चौगुले, वैष्णव सूर्यवंशी, विराज सोहनी शिवशक्ती कडून, तर मयूर खामकर, धीरज मेघे विजय नवनाथ कडून उत्कृष्ट खेळले. कुमार गटाच्या अत्यंत चुरशीने खेळल्या लढतीत स्थानिक हिंदमाता सेवा मंडळाने वीर नेताजी मंडळाचे कडवे आव्हान ३४-३३ असे मोडून काढले. पहिल्या डावात वीर नेताजीने आदित्य चव्हाण, ओम् गावडे, आदित्य मोरे यांच्या संयमी खेळाच्या बळावर हिंदमाता वर लोण देत १९-१६ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात हिंदमाताच्या विजय गोरे, वैभव शिंदे, विनीत कनोजिया यांनी कल्पक खेळ करीत सामन्याच्या शेवटच्या क्षणी सामना एका गुणाने आपल्या नावे केला. या सामन्यात हिंदमाताने ३ अव्वल पकड केल्या. दुसऱ्या सामन्यात वीर संताजीने संस्कृती प्रतिष्ठानला ४१-३७ असे चकविले. पूर्वार्धात दोन्ही संघ २३-२३ अशा बरोबरीत होते. पूर्ण डावात वीर संताजीने ९ बोनस गुण व ४ अवल पकड करीत ८गुण वसूल केले. संस्कृतीने एक लोण व ५ बोनस गुण घेतले. पण ४ केलेल्या अव्वल पकडीमुळे वीर संताजी संघाची सरशी झाली. अनिकेत पिंपरे, प्रणव जाधव वीर संताजी कडून, तर मनोज गोरे, अन्सारी संस्कृती कडून उत्कृष्ट खेळले. याच गटात शिवनेरी सेवाने दुर्गामाता स्पोर्ट्स संघाला ३५-२३ असे नमवित आगेकूच केली. सुशील, प्रिन्स डिसोझा शिवनेरी कडून, तर सुयश जाधव, यश मोने दुर्गामाता कडून उत्तम खेळले.
या स्पर्धेचे उद्घाटन लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलदास पै, सचिव वासुदेव सावंत, कोषाध्यक्ष विकास सावंत, प्रवीण राणे, विद्याधर घाडी आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेस काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे सचिव विश्वास मोरे, कबड्डीतील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजेश पाडावे यांनी सदिच्छा भेट दिली.