
तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
पुणे : गिरिप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक, संस्थेच्या अष्ठहजारी शिखर मोहिमांचे नेते, गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंग आणि गिरिप्रेमी ॲडव्हेंचर फाऊंडेशनचे संस्थापक संचालक उमेश झिरपे यांना २०२३ चा प्रतिष्ठित ‘तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार अर्जुन पुरस्कारास समकक्ष असून भारतातील साहस क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कामगिरीसाठी दिला जातो. हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे शुक्रवारी एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.
हा उल्लेखनीय पुरस्कार उमेश झिरपे यांच्या गिर्यारोहण कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आणि गिरिप्रेमीसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. उमेश झिरपे यांनी आपल्या जीवनाचे समर्पण भारतातील पर्वतारोहणाच्या क्षेत्राच्या प्रगतीसाठी केले आहे, आणि त्यांच्या नेतृत्व, कौशल्य आणि साहसासाठी असलेल्या अढळ भावनांमुळे अनेक नव्या गिर्यारोहकांना प्रेरणा मिळाली आहे.
तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार हे भारतातील साहस क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे आणि उमेश झिरपे यांच्या पर्वतारोहण समुदायातील जीवनभराच्या योगदानामुळे आणि साहसाच्या प्रति असलेल्या निष्ठा आणि उत्साहामुळे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. उमेश झिरपे हे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष असून, यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार श्री शिव छत्रपती साहसी क्रीडा पुरस्कार व जगभरातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.