
बाळासाहेब तोरसकर
नवी दिल्ली : भारतीय खो-खो महासंघाच्या अथक प्रयत्नामुळे खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे आणि पहिला खो-खो विश्वचषक यशस्वी ठरत आहे. या यशाचे श्रेय खेळातील नियमांमध्ये सुधारणा व क्रीडांगणाच्या बदलांना जाते, असे महासंघाचे महासचिव एम एस त्यागी यांनी सांगितले.
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित विशेष मुलाखतीत बोलताना त्यागी यांनी खो-खो खेळाचा आंतरराष्ट्रीय प्रवास आणि भविष्यकालीन योजनांवर प्रकाश टाकला.
नियमांमध्ये बदल : खो-खोचा नवा अवतार
त्यागी म्हणाले, ‘खो-खो खेळाला जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यासाठी आम्हाला खेळाचे स्वरूप बदलावे लागले. खेळ अधिक वेगवान व आकर्षक करण्यासाठी क्रीडांगण लहान केले आणि ७ खेळाडूंना आक्रमणासाठी मैदानावर उतरविण्याचा निर्णय घेतला. संरक्षणासाठी प्रत्येक गटाला समान संधी मिळावी म्हणून प्रत्येक टप्प्यानंतर ब्रेकची व्यवस्था करण्यात आली आहे.

सामन्यात तंत्रज्ञानाचा वापर करत थर्ड अंपायर व अपीलची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे खेळात अधिक पारदर्शकता आली आहे. तसेच, खेळाडूंना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार ठेवण्यासाठी सुधारित नियम महत्त्वाचे ठरले असे त्यागी यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी पावले
भारतीय खो-खो महासंघाने जागतिक स्तरावर खो-खोचा प्रचार करण्यासाठी अल्टिमेट खो-खो लीगचे आयोजन केले. यानंतर पहिला विश्वचषक हा एक मोठा टप्पा ठरला. त्यागी पुढे म्हणाले, ‘२०१७ मध्ये महासंघाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आम्ही जागतिक स्तरावर या खेळाचा प्रसार करण्यासाठी योजना आखल्या. आज ३४ देशांनी भाग घेण्याची तयारी दर्शवली, यापैकी २३ देशांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.’
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पुढची तयारी
खो-खोची राष्ट्रकुल स्पर्धेत सामील होण्याची आमची योजना आहे. यासाठी क्रीडामंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा सुरू आहे. लवकरच या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल, असे त्यागी यांनी सांगितले.
स्वप्न साकार झाले
‘१९६४ पासून खो-खो खेळत असताना हा खेळ कधी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल, असे वाटायचे. आज हे स्वप्न साकार झाले आहे. खेळाडू, प्रशिक्षक, आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले,’ असे सांगत त्यागी यांनी भविष्यकाळात खो-खो खेळाला आणखी व्यापक लोकप्रियता मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
खो-खो : एक वेगवान, आकर्षक खेळ
आंतरराष्ट्रीय स्तरावर बदललेल्या स्वरूपात खेळ अधिक गतिमान व मनोरंजक झाला आहे. यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढला असून, खो-खोचा आंतरराष्ट्रीय प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे.