
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचे वितरण
नवी दिल्ली ः पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी भारताची महिला नेमबाज मनु भाकर आणि जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद विजेता भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश यांच्यासह चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनात क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला. यावेळी क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि इतर केंद्रीय मंत्री देखील उपस्थित होते.
क्रीडा मंत्रालयाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात २०२४ च्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली आणि राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. मनू आणि गुकेश यांच्याव्यतिरिक्त, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पियन प्रवीण कुमार यांनाही खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.

ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर आणि हरमनप्रीतने प्रभावित केले, तर जागतिक स्पर्धा जिंकणाऱया गुकेशने ऑगस्टमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून २२ वर्षीय मनूने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील पहिली खेळाडू बनली होती. पॅरिस ऑलिंपिकमध्ये, हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले. १८ वर्षीय गुकेश हा सर्वात तरुण विश्वविजेता बनला जो गेल्या वर्षी बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारतीय संघाच्या ऐतिहासिक सुवर्णपदकाचा शिल्पकार देखील होता. पॅरा हाय जंपर प्रवीणने पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये टी ६४ प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ही अशा खेळाडूंची श्रेणी आहे ज्यांचे गुडघ्याखाली एक किंवा दोन्ही पाय नाहीत आणि ते धावण्यासाठी कृत्रिम पायांवर अवलंबून असतात.

३४ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार
खेलरत्न व्यतिरिक्त २०२४ मध्ये खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी ३४ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यापैकी खेळाडू सुचा सिंग आणि पॅरा जलतरणपटू मुरलीकांत राजाराम पेटकर यांना अर्जुन पुरस्कार जीवनगौरव प्रदान करण्यात आला. कोचिंग मधील उत्कृष्टतेसाठी पाच जणांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. त्यामध्ये बॅडमिंटन प्रशिक्षक एस मुरलीधरन आणि फुटबॉल प्रशिक्षक अरमांडो अॅग्नेलो कोलाको यांचा आजीवन श्रेणीत समावेश आहे.