
हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन
पुणे : योनेक्स-सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत कायरा रैना हिने दुहेरी मुकुट मिळवला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे ही स्पर्धा झाली. कायरा रैनाने १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे आणि १५ वर्षांखालील गटाच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले. तिने जतिन सराफसह १५ वर्षांखालील गटाचे मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावल्यानंतर १३ वर्षांखालील गटात बाजी मारली. अग्रमानांकित कायराने गार्गी कामठेकरला २१-९, २१-१२ असे पराभूत केले. स्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या एकेरीच्या अंतिम फेरीत अग्रिमा राणाने निधी गायकवाडला २१-८, २१-१० असे नमविले. ११ वर्षांखालील मुलांच्या गटात अर्चित खान्देशेने वेदांत मोरेला १५-२१, २१-१०, २१-११ असे पराभूत केले.
स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत प्रायन महाशब्देने विजेतेपद पटकावले. प्रायनने अगस्त्य कुंदन तितारवर १६-२१, २३-२१, २१-१६ अशा फरकाने पराभूत केले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पीवायसी हिंदू जिमखाना येथे झाला. यावेळी हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश जाधव, पीवायसीचे सचिव दीपक गाडगीळ, तन्मय आगाशे, सारंग लागू, अभिजीत चांदगुडे, सिद्धार्थ पळणीटकर उपस्थित होते. यावेळी कायरा रैना, ओजस जोशी यांना २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती आणि चिन्मय फणसे याला ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.