
जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव, क्रीडा शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, किशोर चौधरी, जयेश मोरे, नेहा देशमुख, मीनल थोरात, जिल्हा सेपक टकारा असोसिएशनचे सचिव प्रा इकबाल मिर्झा, जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व देशाचे पहिले ऑलिम्पियन पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन जयेश मोरे व नेहा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी उपलब्ध क्रीडा सुविधा व खेळाडूंसाठी नव्याने होणाऱ्या सुविधा व त्याचा भविष्यात कसा उपयोग होईल याविषयी सविस्तर माहिती दिली. ऑलिम्पियन खाशाबा जाधव यांचे बालपण, त्यांची शालेय, महाविद्यालयीन क्रीडा कारकीर्द, कराड ते ऑलिम्पिक पर्यंतचा क्रीडा प्रवास त्यात आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात व त्यांचे काळातील व आजच्या काळात उपलब्ध सोयी सुविधा यावर सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी जयेश मोरे व नेहा देशमुख यांचा सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांना ऑलिम्पियन खाशाबा जाधव यांचे जीवन चरित्राचे पुस्तके भेट देण्यात आली. शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ सुमेध तळवेलकर यास नुकतीच शारीरिक शिक्षणात पीएच डी पदवी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. हा सत्कार त्याचे प्रशिक्षक किशोर चौधरी यांनी स्वीकारला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी डॉ सुरेश थरकुडे यांनी केले. कार्यक्रमास विविध खेळांचे क्रीडा प्रशिक्षक, मार्गदर्शक, संघटक व असंख्य खेळाडू यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Nice