
पुनीत बालन यांच्यातर्फे सर्व विजेत्यांना दहा लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर
पुणे : महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन व्हायला हवे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी येथे केले.
बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे बोलत होते. मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले की, ‘ज्युदो हा खेळ माझ्या आवडत्या कुस्ती खेळाशी खूप साम्य असून यातील डावही कुस्ती खेळामध्ये वापरले जातात. त्यामुळे ज्युदो आणि कुस्ती हे युद्धकलेचे खेळ, भाऊ-भाऊच आहेत.
स्पर्धेचे शानदार उद्घाटन
प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. यावेळी पुनीत बालन यांनी स्पर्धेतील सहभागी पदक विजेत्यांसाठी रोख दहा लाख रुपयांची बक्षिसांची घोषणा केली. त्यामध्ये सुवर्णपदक विजेत्यास ११ हजार रुपये, रौप्य पदक विजेत्यास सात हजार रुपये तर दोन्ही कांस्यपदक विजेत्यास पाच हजार प्रत्येकी असे बक्षीस जाहीर केले.
यावेळी व्यासपीठावर इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचे तथागत मुखर्जी आणि ज्युदो फेडरेशनचे पदाधिकारी वीरेंद्र वशिष्ठ, सी एस राजन यांसह द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त जीवन शर्मा, अर्जुन पुरस्कार प्राप्त यशपाल सोलंकी, राज्य ज्युदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
समारंभास पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक विजेता अर्जुन पुरस्कार प्राप्त सचिन खिलारे यांना विशेष आमंत्रित केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांनी तर आभार प्रदर्शन तांत्रिक सचिव दत्ता आफळे यांनी केले.
स्पर्धेसाठी सबज्युनियर गटामध्ये २९ राज्यातील २३५ मुले आणि २३० मुली असे एकूण ४६५ खेळाडू सहभागी झाले आहेत.