
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँकने स्वीकारले प्रायोजकत्व; पाच वर्षासाठी करार
मुंबई : महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या कबड्डी या खेळाला महाराष्ट्र स्टेट को -ऑप बँक लिमिटेडचे प्रायोजकत्व लाभले आहे. १ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०३० पर्यंत पाच वर्षांसाठी हा करार झाला असून त्यासाठी दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लिमिटेडकडून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला ९५ लाख रुपये देण्यात आले.
बारामती येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज करंडक कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक लिमिटेडचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी हा धनादेश महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस बाबुराव चांदेरे आणि कोषाध्यक्ष मंगल पांडे यांना सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्यातील करारान्वये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धां करिता निवडण्यात आलेल्या राज्याच्या संघातील खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांचा गणवेश आणि अन्य साहित्याचा समावेश असेल. पुढील पाच वर्षे पुरुष-महिला गट, कुमार-कुमारी गट, किशोर-किशोरी गट या राष्ट्रीय स्पर्धा, पुरुष-महिला गट, कुमार-कुमारी गट या फेडरेशन चषक स्पर्धा आणि बीच कबड्डी स्पर्धेसाठीच्या राज्याच्या संघासाठीच्या गणवेश आणि अन्य साहित्याला दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक लिमिटेड यांचे प्रायोजकत्व असेल. राज्यस्तरीय आणि राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत नेमण्यात आलेल्या पंचांच्या गणवेशाचाही यात समावेश आहे,’ असे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष मंगल पांडे यांनी सांगितले.