
इंग्रजी शाळांचे विविध प्रश्न तत्काळ सोडवण्याची दादा भुसे यांच्याकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन (मेसा) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील इंग्रजी शाळांच्या समस्यांबाबत निवेदन सादर केले. तसेच मेसा संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रवीण आव्हाळे, राज्य सरचिटणीस संदीप लघामे पाटील, मुजाबोद्दीन शेख यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
छत्रपती संभाजीनगर येथे मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन (मेसा) संघटनेतर्फे आयोजित ‘विद्यार्थी सुरक्षा व दर्जेदार शिक्षण’ या कार्यक्रमाचे निमंत्रण शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना देण्यात आले. तसेच शालेय शिक्षण मंत्री यांना राज्यातील इंग्रजी शाळेंच्या समस्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
राज्यातील इंग्रजी शाळांची शैक्षणिक वर्ष २०१२ ते २०२४ पर्यंतची आरटीई अंतर्गत प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांनचे थकित प्रतिपूर्ती रक्कम २५०० कोटी १०० टक्के अदा करावी, आरटीई प्रतिपूर्ती रक्कम १७६७० रुपये शासन देते पण गेल्या ८ वर्षांपासून या रक्कमेत वाढ झालेली नाही. परंतु, महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आरटीई प्रतिपूर्ती रक्कम ३५ हजार रुपये करावी, उच्च न्यायालयाने १०० टक्के आरटीई प्रतिपूर्ती रक्कम ४ आठवड्याच्या आत द्यावी असा आदेश दिला आहे तरी त्या इंग्रजी शाळांना १०० टक्के आरटीई प्रतिपूर्ती रक्कम तात्काळ देण्यात यावी, शाळेवर होणाऱ्या हल्ल्यापासून व खंडणीखोरांपासून बचाव करण्यासाठी शाळा संरक्षण कायदा लागू करावा, केंद्र व राज्य सरकारने आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम पीएफएमएस प्रणालीद्वारे ऑनलाइन सरळ इंग्रजी शाळांच्या बँक खात्यावर वर्ग करावी, राज्यातील अनाधिकृत पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक इंग्रजी शाळा शिक्षण अधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांच्या मार्फत शोधून तत्काळ त्या बोगस शाळा बंद करून संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे, इंग्रजी शाळांना लोकप्रतिनिधींचा निधी वापरता यावा, तसेच अनुदानित शाळेप्रमाणे इंग्रजी शाळांना क्रीडा विभागाच्या योजनेचा लाभ देण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना मेसा संघटनेतर्फे देण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालया करिता नवीन इमारतीचे बांधकाम चालू आहे. या इमारतीमध्ये इतरांप्रमाणे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन (मेसा) या मान्यता प्राप्त शैक्षणिक संघटनेला कार्यालयीन कामकाजा करिता हक्काचे कार्यालय देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेता इंग्रजी शाळांच्या मागण्या मांडण्यात आल्या व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी इंग्रजी शाळेंच्या समस्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली.
यावेळी मेसा संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा प्रवीण आव्हाळे, राज्य सरचिटणीस संदीप लघामे पाटील, मुजोबोद्दीन शेख यांनी इंग्रजी शाळेच्या समस्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्य कार्याध्यक्ष हनुमान भोंडवे, राज्य उपाध्यक्ष नागेश जोशी, राज्य कोषाध्यक्ष डॉ संजय पाटील, जिल्हा अध्यक्ष सुनील मगर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मंजुषा शुक्ल, जिल्हा सचिव प्रा अक्षय न्यायाधीश यांनी सहकार्य केले.