बॉक्सिंग खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून अस्थायी समितीची स्थापना 

  • By admin
  • January 21, 2025
  • 0
  • 27 Views
Spread the love

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा निर्णय; दीपक मेजारी चेअरमन 

पुणे : महाराष्ट्रातील बॉक्सिंग खेळाडूंचे नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने घटनेतील तरतुदीनुसार राज्यातील बॉक्सिंग खेळासाठी अस्थायी समिती स्थापन केली आहे. या अस्थायी समितीचे चेअरमन दीपक मेजारी हे असणार आहेत. या समितीत इतर पाच सदस्य व एक समन्वयक असणार आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी राज्यातील बॉक्सिंग खेळाडूंचे नुकसान होऊ नये यासाठी अस्थायी समिती स्थापन केली आहे. या समितीत चेअरमन दीपक मेजारी यांच्यासह बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचा प्रतिनिधी, ऑलिम्पियन मनोज पिंगळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार्थी गिरीश पवार, महिला बॉक्सिंग खेळाडू प्रतिनिधी, क्रीडा कार्यालयातील मार्गदर्शक सतीश भट यांची सदस्य म्हणून समितीत समावेश आहे. तसेच निलेश जगताप हे समन्वयक म्हणून काम पाहतील.

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा कार्यकाळ २९ डिसेंबर २०२२ रोजी संपुष्टात आलेला आहे. तेव्हापासून राज्य बॉक्सिंग संघटनेची निवडणूक झालेली नसल्यामुळे बॉक्सिंग खेळाच्या राज्य स्पर्धांचे आयोजन होत नाही. त्यामुळे अनेक खेळाडूंचे नुकसान होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या २० ऑक्टोबर २०२४ व ११ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या कार्यकारिणी सभेतील ठरावानुसार व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेतील तरतुदीनुसार खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून अस्थायी समिती स्थापन करणयात आली आहे. तसेच या अस्थायी समितीच्या सुरळीत कामकाजासाठी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष जय कवळी व सचिव राकेश तिवारी हे या समितीस वेळोवेळी सहकार्य करतील.

या अस्थायी समितीची कार्यकक्षा व अधिकार देखील महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने निर्धारित केले आहेत. त्यानुसार ही अस्थायी समिती बॉक्सिंग खेळाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करणे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या संघाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करमे व या संघाच्या सहभागाचे आयोजन व नियोजन करणे, राष्ट्रीय संघटनेच्या मान्यतेने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करणे, शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी योग्य व पात्र रेफ्री व मार्गदर्शकांची निवड करणे असे कार्य करणे अपेक्षित आहे. तसेच या समितीस कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. ही समिती केवळ बॉक्सिंग खेळाचे दैनंदिन कामकाज पाहणार आहे. ही अस्थायी समिती महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारिणी समितीच्या कार्यकक्षेच्या अंतर्गत राहील असे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *