
व्हेरॉक औद्योगिक क्रिकेट स्पर्धा : भास्कर जीवरग, सुदर्शन एखंडे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : १८व्या व्हेरॉक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात कॉस्मो फर्स्ट इंडस्ट्रीज संघाने स्कोडा वोक्सवॅगन इंडिया संघाचा ८९ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात शहर पोलिस संघाने सीएसएमसी संघावर नऊ विकेट राखून मोठा विजय संपादन केला. या सामन्यांमध्ये भास्कर जीवरग आणि सुदर्शन एखंडे यांनी सामनावीर किताब संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात कॉस्मो फर्स्ट इंडस्ट्रीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात आठ बाद १६७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना स्कोडा वोक्सवॅगन इंडिया संघ १३.५ षटकात ७८ धावांवर सर्वबाद झाला. कॉस्मो फर्स्ट संघाने तब्बल ८९ धावांनी सामना जिंकला.
या लढतीत भास्कर जीवरग (४९), विराज चितळे (३०) व रामेश्वर मतसागर (२४) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत भास्कर जीवरग याने १० धावांत पाच विकेट घेऊन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विराज चितळे याने १४ धावांत तीन गडी टिपून अष्टपैलू कामगिरी बजावली. रामेश्वर मतसागर याने २२ धावांत दोन गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात सीएसएमसी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात पाच बाद १४५ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना शहर पोलिस संघाने १५.१ षटकात एक बाद १४९ धावा फटकावत नऊ विकेट राखून दणदणीत विजय साकारला. या सामन्यात ओंकार मोगल याने ५० चेंडूत नाबाद ७० धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने दहा चौकार मारले. प्रदीप जगदाळे (५९), अतुल (नाबाद ५४), सुदर्शन एखंडे (६४) यांनी शानदार फलंदाजी करत मैदान गाजवले.
संक्षिप्त धावफलक : १) कॉस्मो फर्स्ट इंडस्ट्रीज : २० षटकात आठबाद १६७ (सतीश भुजंगे ५, सनी राजपूत १५, रामेश्वर मतसागर २४, संभाजी साबळे ९, विराज चितळे ३०, सागर दाभाडे ८, भास्कर जीवरग ४९, रामशिष नाबाद ७, इतर १७, विश्वास प्रमोद २-२५, विशाल गिते २-३१, मोहन भुमरे २-२२, सलमान अहमद १-२३, शेख नजीम १-३३) विजयी विरुद्ध स्कोडा वोक्सवॅगन इंडिया : १३.५ षटकात सर्वबाद ७८ (सलमान अहमद ५, संदीप खोसरे ११, विशाल गिते ९, संदीप राठोड ८, शेख नजीम नाबाद १३, इतर २३, भास्कर जीवरग ५-१०, विराज चितळे ३-१४, रामेश्वर मतसागर २-२२). सामनावीर : भास्कर जीवरग.
२) सीएसएमसी : २० षटकात पाच बाद १४५ (प्रदीप जगदाळे ५९, अतुल नाबाद ५४, अल्ताफ खान नाबाद १८, राजू परचाके २-२१, आसिफ शेख १-१६, रिझवान अहमद १-१७, सुदर्शन एखंडे १-२०) पराभूत विरुद्ध शहर पोलिस : १५.१ षटकात एक बाद १४९ (ओंकार मोगल नाबाद ७०, सुदर्शन एखंडे ६४, अल्ताफ खान १-४६). सामनावीर : सुदर्शन एखंडे.