
मासिया प्रीमियर लीग क्रिकेट : कौशिक पाटील, मुकेश भरते, सिद्धार्थ सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : मासिया प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सीमेन्स एनर्जीझर्स, रेयॉन मासिया वॉरियर्स आणि किर्दक महावितरण चार्जर्स या संघांनी विजयी आगेकूच कायम ठेवली. या सामन्यांमध्ये कौशिक पाटील, मुकेश भरते आणि सिद्धार्थ यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.
एडीसीए क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात सीमेन्स एनर्जीझर्स संघाने एआयटीजी अॅव्हेंजर्स संघाचा २६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सीमेन्स संघाने १५ षटकात नऊ बाद ११० धावा काढल्या. प्रत्युत्तरात एआयटीजी संघ १२.३ षटकात ८४ धावांवर सर्वबाद झाला.
या सामन्यात नितीन निकम (२७), कौशिक पाटील (१८) व अनंता कोळसे (१६) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत नितेश विंचूरकर याने १० धावांत चार विकेट घेत सामना गाजवला. अजित पाटील (३-१८)व रामंधरबाबू ठुमपाल (२-८) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.
दुसऱ्या सामन्यात रेयॉन मासिया वॉरियर्स संघाने एंड्रेस हाऊसर इलेव्हनवर चुरशीच्या झुंजीत अवघ्या सहा धावांनी रोमांचक विजय साकारला. या लढतीत प्रथम फलंदाजी करताना रेयॉन मासिया वॉरियर्स संघाने १५ षटकात सहा बाद १४६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. एंड्रेस हाऊसर इलेव्हनने या धावसंख्येचा चांगला पाठलाग केला. १५ षटकात त्यांनी सहा बाद १४० धावा काढल्या. अवघ्या सहा धावांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
या सामन्यात गिरीश टेकाळे याने ४६ चेंडूत ८० धावांची आक्रमक खेळी केली. त्याने पाच उत्तुंग षटकार व सहा चौकार मारले. मुकेश भरते (३८) आणि रणजीत पाटील (३७) यांनी धमाकेदार फटकेबाजी केली. गोलंदाजीत निकित चौधरी (२-१८), जलज चौधरी (२-२८) व रवींद्र कुलकर्णी (२-३१) यांनी प्रभावी मारा करत प्रत्येकी दोन गडी बाद केले.
तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना धनंजय डॉमिनेटर्स संघाने १४.४ षटकात सर्वबाद १०१ असे माफक लक्ष्य उभे केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना किर्दक महावितरण चार्जर्स संघाने १२.३ षटकात सहा बाद १०६ धावा फटकावत चार विकेट राखून सामना जिंकला. एकवेळ किर्दक संघ मोठा विजय मिळवण्याच्या स्थितीत होता. परंतु, ७३ ते ८८ या धावसंख्येत त्यांनी सहा फलंदाज गमावले.
या सामन्यात सिद्धार्थ (४३), मोहसिन शेख (३६) व आकाश पाटील (२८) यांनी शानदार फलंदाजी केली. गोलंदाजीत सुरज थोरमोटे (३-८), प्रदीप चव्हाण (२-६) व प्रमोद जाधव (२-८) यांनी प्रभावी स्पेल टाकला.
संक्षिप्त धावफलक : १) सीमेन्स एनर्जीझर्स : १५ षटकात नऊ बाद ११० (अजय गव्हाणे ९, अजित पाटील १३, कौशिक पाटील १८, चारुदत्त भोसले ७, सतीश पाठक ११, नितीन निकम २७, वैभव कोकाटे नाबाद ८, नितेश विंचूरकर ४-१०, अनंता कोळसे २-१७, मधुकर इंगोले १-२२, विशाल जैस्वाल १-१२) विजयी विरुद्ध एआयटीजी अॅव्हेंजर्स : १२.३ षटकात सर्वबाद ८४ (नितेश विंचूरकर ८, गौरव भोगले १६, अनंता कोळसे १६, भागवत शेळके ८, विशाल जैस्वाल ७, गणेश जाधव नाबाद ६, अजित पाटील ३-१८, रामंभरबाबू ठुमपाल २-८, कौशिक पाटील २-८, सतीश पाठक १-२१, अजय गव्हाणे १-१४). सामनावीर : कौशिक पाटील.
२) रेयॉन मासिया वॉरियर्स : १५ षटकात सहा बाद १४६ (रणजीत पाटील ३७, राहुल घोगरे ५, धर्मेंद्र वासानी नाबाद ३५, मुकेश भरते ३८, किरण जगताप नाबाद ६, रवींद्र कुलकर्णी २-३१, जलज चौधरी २-२८, गिरीश टेकाळे १-३१, जयेश पोकळे १-३२) विजयी विरुद्ध एंड्रेस हाऊसर ११ : १५ षटकात सहा बाद १४० (जलज चौधरी १५, गिरीश टेकाळे ८०, अक्षय बाहेती १०, रवींद्र कुलकर्णी नाबाद २०, निकित चौधरी २-१८, संदीप पाटील १-४५, मुकेश भरते १-१६, धर्मेंद्र वासानी १-२०). सामनावीर : मुकेश भरते.
३) धनंजय डॉमिनेटर्स : १४.४ षटकात सर्वबाद १०१ (बापू कुबेर ११, सुरज थोरमोटे ११, कृष्णा कानगोळकर १४, अर्जुन गवळी ७, मोहसिन शेख नाबाद ३६, रवी लोळगे २-१६, प्रदीप चव्हाण २-६, प्रमोद जाधव २-८, पवन सरोवर १-१२, कैलास शेळके १-२२, विलास राठोड १-३) पराभूत विरुद्ध किर्दक महावितरण चार्जर्स : १२.३ षटकात सहा बाद १०६ (आकाश पाटील २८, सिद्धार्थ ४३, प्रदीप चव्हाण नाबाद १३, विलास राठोड नाबाद १२, सुरज थोरमोटे ३-८, कृष्णा कानगोळकर १-२३, अर्शद शेख १-२३). सामनावीर : सिद्धार्थ.