
जैन इरिगेशनच्या जैन सुप्रिमोज संघाने पदार्पणातच ट्रॉफी पटकावली
जळगाव : डेक्कन प्रीमियर कॅरम लीग सीझन ३ भव्य पद्धतीने संपला. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या जैन सुप्रिमोज कॅरम संघाने पहिल्यांदा सहभाग घेत विजेतेपद पटकावले.
पहिल्याच प्रयत्न अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत विजय खेचून आणला. देशभरातून आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातील स्ट्राईकफोर्स संघाला अंतिम सामन्यात ३-२ अशा फरकाने नमवत दिमाखात विजेतेपदाला जैन सुप्रिमोज संघाने गवसणी घातली.
विशाखापट्टणम् येथील एस थ्री स्पोर्टस एरिना येथे डेक्कन प्रीमियर कॅरम लीग स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. जैन इरिगेशनच्या जैन सुप्रिमोज संघात कर्णधार संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, गौतम भोई, एम एस के हरिका, झैयद अहमद, नईम अन्सारी, रहीम खान यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून सय्यद मोहसीन यांनी भूमिका बजावली.
तीन दिवसांमध्ये १६५ सामने खेळवले गेले. या सीझनमध्ये १२ लाखांची पारितोषिके विजेत्यांना वितरित केली गेली. जैन इरिगेशनच्या जैन सुप्रिमोजने डेक्कन प्रीमियर लिगमध्ये उत्कृष्ट कौशल्य आणि टीमवर्क दाखवून प्रथम स्थान मिळवले. रोख पारितोषिक व भला मोठ्या चषकाने जैन सुप्रिमोज संघाचा सन्मान करण्यात आला.
विजयी संघाचे जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक व जैन सुप्रिमोज संघाचे संघ मालक अतुल जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू व प्रशिक्षक यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
डेक्कन प्रीमियर कॅरम लीग सीझन ३ चे पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कॅरम खेळातील अपवादात्मक प्रतिभा ओळखून डेक्कन प्रीमियर लिगचे अध्यक्ष डॉ. नीरज कुमार संपथी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्यासोबत प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस व्ही डी नारायण उपस्थित होते. ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस भारती नारायण, आंध्रप्रदेश राज्य कॅरम असोसिएशनचे सरचिटणीस एस के अब्दुल जलील यांनी स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून काम पाहिले.
विजेत्यांसाठी, अव्वल खेळाडू आणि संघांना संपूर्ण लीगमध्ये त्यांच्या कामगिरीबद्दल सन्मानित केले. जैन सुप्रिमो संघाने प्रथम, द्वितीय स्ट्राइक फोर्स, नव्या भारती स्ट्रायकर्सने तिसरा क्रमांक पटकावला. चार्मी-नार चॅलेंजर्सने अव्वल चार संघांना मागे टाकत चौथ्या स्थान संपादन केले.