
मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ३ फेब्रुवारीपासून १,२५,००० डॉलर पारितोषिक रकमेच्या एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने १ फेब्रुवारी पासून सुरू होणार असून मुख्य ड्रॉ चे सामने ३ फेब्रुवारी पासून रंगणार आहेत. स्पर्धेचे अंतिम फेरीचे सामने ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
संयोजन समितीचे मुख्य सदस्य आणि आयएएस संजय खंदारे आणि प्रवीण दराडे यांनी स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, मुंबईतील टेनिस प्रेमींसाठी फेब्रुवारीचा पहिला आठवडा रोमांचकारी ठरणार असून सलग चौथ्या वर्षी एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेचे आयोजन करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. स्पर्धेच्या गेल्या तीनही मालिकेत रोमांचकारी लढती पहावयास मिळाल्या असून हे वर्षही त्याला अपवाद ठरणार नाही. मुंबई ही स्वप्नांची नगरी असून येथील क्रिडा प्रेमी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी हि स्पर्धा अधिक खास करतात आणि यावर्षी देखील त्याची पुनरावृत्ती नक्की पाहायला मिळेल. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर यापूर्वी जगातील अनेक दिग्गज खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून यंदाच्या वर्षी त्यात आणखी काही मानांकित खेळाडूंची भर पडणार आहे.
डब्लुटीए १,२५,००० डॉलर दर्जाच्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नामांकित आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये जागतिक क्रमवारीत ८९व्या स्थानी असलेल्या तात्याना मारिया हिचा समावेश आहे. या स्पर्धेत आपल्या कारकिर्दितील चौथे विजेतेपद मिळवण्याचा ती प्रयत्नात राहणार आहे. याआधी जागतिक क्रमवारीतील ४२व्या स्थानी असलेल्या मारिया हिने २०२२ मध्ये वयाच्या ३४व्या वर्षी विंबल्डन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून विक्रमी कामगिरी केली होती. तसेच, तिने कोलंबिया येथे २०२३ व २०२४ मध्ये पार पडलेल्या कोपा कोल्सेनिटास डब्लूटीए २५० स्पर्धेत सलग दोन वर्षे विजेतेपद पटकावले होते.
मारिया बरोबरच कॅनडाची जागतिक क्रमांक ९८ व्या स्थानी असलेली रिबेका मेरीनोदेखील सहभागी होणार आहे. याआधी तिने आपल्या कारकीर्दीत जागतिक क्रमवारीतील ३८ व्या स्थानी गाठणाऱ्या रिबेका हिचा गेल्या चार महिन्यांत दुसरे डब्लूटीए स्पर्धेतील विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असणार आहे. तिने नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकेत झालेल्या दाऊ टेनिस क्लासिक स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.
जागतिक क्रमवारीत १०४व्या स्थानी असलेल्या स्पेनच्या नुरिया पेरिझास डियाझ हिने आपल्या कारकिर्दीत तीन डब्ल्यूटीए स्पर्धेत विजेतेपद पटकावले असून २०१६मध्ये खांद्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर कॅनबेरा डब्लूटीए १२५००० डॉलर स्पर्धेत उपांत्य फेरी गाठताना तिने हार्ड कोर्टवर काही अनपेक्षित निकाल नोंदवले आहेत.
गतविजेती लात्वियाची दारजा सेमेनिस्तया जागतिक क्रमवारीत १२० व्या स्थानी असून यंदा विजेतेपद राखण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने गेल्या वर्षी अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर हीचा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला होता.
विंबल्डन स्पर्धेत मिश्र दुहेरीची अंतिम २०२१मध्ये खेळणाऱ्या आणि इंग्लंडमध्ये २०२२ व २०२४ मध्ये बिलीझिनकिंग कप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठून देणाऱ्या हॅरीएट डार्ट हिचाही पहिल्या डब्ल्यूटीए स्पर्धेत विजेतेपद पत्कवणायासाठी प्रयत्न राहणार आहे.
सर्वांचे लक्ष लागलेल्या आणि राफेल नदालने त्याच्या अकादमी साठी निवडलेल्या फिलिपिन्सच्या १९ वर्षीय अलेकझांड्रा इयाला हिचा समावेश आहे. जागतिक क्रमवारीत १३८व्या स्थानावर असलेल्या अलेक्झांड्रा हिने याआधी ज्युनिअर ग्रँड स्लॅम स्पर्धेत एकेरीत एक व दुहेरीत दोन विजेतेपद पटकावले आहे. तसेच, क्रोएशियाची माजी ज्युनियर जागतिक क्रमांक १ पेट्रा मार्सिंको हिच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.
डब्ल्यूटीए स्पर्धा मालिकेत दोन एकेरी व दोन दुहेरी गटात विजेतेपद पटकावणारी झिल ताईशमन हिच्यासह नऊ वेळा ग्रँडस्लॅम दुहेरी गटात विजेतेपद पटकावणाऱ्या क्रिस्टिना लाडेनोव्हिकचा देखील आव्हान बिरणमध्ये समावेश आहे.
सहा वर्षांनंतर २०२४ मध्ये एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेने पुनरागमन केले होते. यामध्ये लत्वियाच्या दारजा सेमेनिस्तया हीने एकेरीत तर, दलिला जाकुपोव्हिक व सब्रीना सांतामारिया यांनी दुहेरीत विजेतेपद पटकावले होते. तत्पूर्वी, २०१७ मध्ये सबालेंका हिने, २०१८ मध्ये लुक्सिका कुमखुम हिने विजेतेपदाचा मान पटकावला होता.