
क्वार्टर फायनलमध्ये अल्काराजचा पराभव केला
मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये नोवाक जोकोविच याने कार्लोस अल्काराझचा ४-६, ६-४, ६-३, ६-४ असा पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठली.
या सामन्यात जोकोविचला पहिल्या सेट ४-६ असा गमवावा लागला. त्यानंतर ३७ वर्षीय स्टार खेळाडू जोकोविच याने शानदार पुनरागमन केले आणि सलग तीन सेट जिंकून सामना जिंकला. या विजयासह जोकोविचने उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्याचा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याच्याशी होईल. दुसऱ्या एका क्वार्टरफायनलमध्ये झ्वेरेव्हने जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या टॉमी पॉलचा ७-६ (१), ७-६ (०), २-६, ६-१ असा पराभव केला. हा सामना २४ जानेवारी रोजी खेळला जाईल.
ऑस्ट्रेलियन ओपनमधील ९९ व्या विजयासह जोकोविचने विक्रमी २५ व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाकडे जोरदार वाटचाल केली. त्याने त्याच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान असलेल्या अल्काराजला पराभूत करून १२ व्यांदा स्पर्धेच्या शेवटच्या चारमध्ये आपले स्थान निश्चित केले.
हा सामना जिंकल्यानंतर जोकोविच म्हणाला, ‘आजचा सामना अंतिम असावा अशी माझी इच्छा आहे. या कोर्टवर किंवा कोणत्याही कोर्टवर मी खेळलेल्या सर्वोत्तम सामन्यांपैकी हा एक होता.‘