
व्हेरॉक औद्योगिक क्रिकेट स्पर्धा : राजू परचाके आणि रोहन शहा सामनावीर, व्यंकटेश काणेची अष्टपैलू कामगिरी
छत्रपती संभाजीनगर : १८व्या व्हेरॉक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत शहर पोलिस संघाने कंबाइंड बँकर्स संघावर ७० धावांनी मोठा विजय नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात मासिया संघाने एमआर इलेव्हनवर आठ विकेटने मात करुन उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. या सामन्यांमध्ये राजू परचाके आणि रोहन शहा यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. कंबाइंड बँकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शहर पोलिस संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात आठ बाद १६९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना कंबाइंड बँकर्स संघाने १६.१ षटकात आठ बाद ९९ धावा काढल्या. शहर पोलिस संघाने ७० धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात व्यंकटेश काणे याने ४३ चेंडूत ५० धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. त्याने आठ चौकार मारले. ओमकार मोगल याने चार चौकारांसह ३३ धावा फटकावल्या. सुदर्शन एखंडे याने २५ चेंडूत २८ धावा काढल्या. त्याने तीन चौकार मारले. गोलंदाजीत राजू परचाके याने ९ धावांत चार विकेट घेत सामना गाजवला. श्याम लहाने याने ३० धावांत दोन गडी बाद केले. व्यंकटेश काणे याने २६ धावांत दोन गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी बजावली.

दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत मासिया संघाने एमआर इलेव्हन संघाला अवघ्या ७० धावांवर रोखून सामन्यावर वर्चस्व गाजवले. मासिया संघाने विजयी ७१ धावांचे लक्ष्य ७.५ षटकांत गाठले. मासिया संघाने दोन बाद ७६ धावा फटकावत आठ विकेटने सामना जिंकला आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
या सामन्यात मुकीम शेख (२७), निकित चौधरी (२०), रोहन शहा (१३) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत धर्मेंद्र वासनी (२-६), गिरीश खत्री (२-११) व हितेश पटेल (२-१३) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : १) शहर पोलिस : २० षटकात आठ बाद १६९ (पांडुरंग गाजे २०, राम राठोड ११, सुदर्शन एखंडे २८, ओंकार मोगल ३३, राहुल जोनवाल २२, रिझवान अहमद नाबाद ११, आसिफ शेख नाबाद ८, श्याम लहाने २-३०, दिनेश कुंटे २-३७, व्यंकटेश काणे २-२६, इम्रान अली खान १-३७, अभिषेक ठेंगे १-२६) विजयी विरुद्ध कंबाइंड बँकर्स : १६.१ षटकात आठ बाद ९९ (व्यंकटेश काणे ५०, निखिल मुरुमकर ६, इम्रान अली खान २५, राजू परचाके ४-९, राम राठोड १-१२, पांडुरंग गाजे १-१५, आसिफ शेख १-५). सामनावीर : राजू परचाके.
२) एमआर इलेव्हन : १५.२ षटकात सर्वबाद ७० (शेख वसीम ७, अदनान अहमद १०, मोहम्मद आमेर ५, कय्युम ५, आरीझ अंद्राबी ८, सतीश काळुंके ५, शमी १३, वसीम मस्तान २-१७, गिरीश खत्री २-११, धर्मेंद्र वासानी २-६, हितेश पटेल २-१३, रोहन शहा २-१३) पराभूत विरुद्ध मासिया : ७.५ षटकात दोन बाद ७६ (मुकीम शेख २७, निकित चौधरी २०, रोहन शहा नाबाद १३, मधुर पटेल नाबाद १, आरीझ अंद्राबी १-१७). सामनावीर : रोहन शहा.