राष्ट्रीय स्नूकर व बिलियर्ड्स स्पर्धेत पुण्याच्या आरव संचेतीला ऐतिहासिक दुहेरी मुकुट

  • By admin
  • January 23, 2025
  • 0
  • 24 Views
Spread the love

बिलियर्ड्स व स्नूकर या दोन्हीमध्ये विजेतेपद मिळवणारा पुण्याचा पहिला खेळाडू

इंदोर : महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पुण्याच्या आरव संचेती याने सातत्यपूर्ण कौशल्याचा प्रत्यय घडविला आणि ९१ व्या राष्ट्रीय स्नुकर व बिलियर्ड्स स्पर्धेतील सब ज्युनियर स्नूकरमध्येही विजेतेपद पटकावले. चौदा वर्षीय आरवने याआधी या स्पर्धेतील बिलियर्ड्समध्ये विजेतेपद पटकावले होते. एकाच वेळी सब ज्युनियर बिलियर्ड्स व स्नूकर या दोन्ही क्रीडा प्रकारात विजेतेपद मिळवणारा तो पुण्याचा पहिला खेळाडू आहे. त्याची ही कामगिरी ऐतिहासिक मानली जात आहे.

भारतीय बिलियर्ड्स व स्नूकर महासंघाच्या वतीने आणि मध्य प्रदेश बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन आणि यशवंत क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येथील प्रतिष्ठित यशवंत क्लबच्या स्मॅश हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेतील सब-ज्युनियर स्नूकरच्या अंतिम फेरीत संचेतीने गुजरातच्या भव्य पिपलिया याचा ४-२ (१५-६२, ९३-१५, ७०-२५, २४-६०, ६०-५३, ७४-२८) असा रंगतदार लढतीनंतर पराभव केला. पहिली फ्रेम गमावल्यानंतर, आरवने जोरदार पुनरागमन केले आणि दुसरी आणि तिसरी फ्रेम जिंकून २-१ अशी आघाडी घेतली. भव्यने पुन्हा चौथी फ्रेम जिंकली आणि २-२ अशी बरोबरी साधली. पण आरवने आपला संयम गमावला नाही. त्याने एक सर्वोत्तम कौशल्य दाखवीत शेवटच्या दोन्ही फ्रेम्स जिंकल्या आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

आरव हा नॅशनल ओपन स्कूल (एन आय ओ एस) योजनेअंतर्गत शिकत असून तो पीवायसी हिंदू जिमखाना, अमनोरा फर्न क्लब व खार जिमखाना येथे नियमित सराव करीत आहे त्याला आंतरराष्ट्रीय खेळाडू यासीन मर्चंट यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *