
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसंदर्भात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम दिसून येत आहे. या स्पर्धेत खेळताना भारतीय संघातील खेळाडूंना जर्सी परिधान करावी लागणार आहे. त्यावर पाकिस्तान लिहिलेले असणार आहे. यावरुन मीडियात बरीच चर्चा होत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी बीसीसीआय या प्रकरणात आयसीसीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करेल असे स्पष्ट केले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये होणार आहे. परंतु भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये हायब्रीड मॉडेलनुसार होणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीने हायब्रीड मॉडेलला मान्यता दिली होती. यजमान राष्ट्र नियमावलीचा भाग म्हणून संघाच्या किटवर पाकिस्तान लिहिण्यास बीसीसीआय उत्सुक नसल्याचे वृत्त मीडियातून समोर आले. तथापि, आयसीसीने भारतीय बोर्डाला सांगितले होते की भारतीय संघाच्या किटवर पाकिस्तान लिहिलेले असावे कारण पाकिस्तान हा या स्पर्धेचा मूळ यजमान देश आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर सैकिया यांनी पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, ‘चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान पोशाखांबाबत बीसीसीआय आयसीसीचे सर्व नियम पाळेल. लोगो आणि गणवेशांशी संबंधित नियमांबाबत इतर संघ जे काही करतील, आम्ही त्यांचे पूर्णपणे पालन करू.’
तथापि, सैकिया यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आयसीसीच्या प्री-टूर्नामेंट कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाईल की नाही हे सांगितले नाही. त्यामध्ये कर्णधाराची पत्रकार परिषद आणि अधिकृत फोटोशूटचा समावेश आहे. सैकिया म्हणाले की, ‘रोहित शर्मा आयसीसी मीडिया कार्यक्रमांसाठी पाकिस्तानला जाणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.