सांगली येथे ज्युदो खेळाचे निपुणता केंद्र उभारणार : चंद्रकांतदादा पाटील

  • By admin
  • January 23, 2025
  • 0
  • 135 Views
Spread the love

 
पुनीत बालन यांच्यातर्फे कॅडेट राष्ट्रीय ज्युदो विजेत्यांसाठी रोख बक्षीसांचा वर्षाव

पुणे : पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र असोसिएशनच्या मदतीने सांगली येथे ज्युदो खेळाचे खेळाडू निपुणता केंद्र उघडण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील असे अभिवचन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कॅडेट गटाच्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दिले.

देशभरातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, ‘देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये खेळ आणि खेळाडूंचा उत्कर्ष व्हावा यासाठी मोदी सरकार प्रयत्नशिल आहे. यासाठी खेळाडू आणि खेळांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या यादीतील खेळाडूंना नोकरीमधील पाच टक्के आरक्षण आणि दहावी तसेच बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी २५ मार्कांची उपलब्धता करून दिलेली आहे तसेच रोख रकमांचीही तरतूद केली आहे.’

शिव छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी येथे इंस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स आणि पुनीत बालन ग्रुप यांचा सहकार्याने आयोजित १५ ते १८ वयोगटातील कॅडेट श्रेणीच्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत २९ राज्यातील जवळपास ६०० खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि पदाधिकारी यांचा सहभाग आहे. 

पुन ीत बालन यांची पाच लाखांची घोषणा
प्रसिद्ध युवा उद्योजक पुनीत बालन यांनी या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेतील कॅडेट गटाच्या विजेत्या खेळाडूंसाठी भरघोस बक्षिसांची घोषणा केली. यामध्ये त्यांनी मुला-मुलींच्या एकूण १६ वजन गटातील प्रत्येक सुवर्णपदक प्राप्त खेळाडूंसाठी ११ हजार, रौप्यपदक प्राप्त खेळाडूसाठी ७ हजार तर दोन कांस्यपदक विजेत्यांसाठी ५ हजार रुपये प्रत्येकी अशी जवळपास पाच लाख रुपयांच्या बक्षीस रकमेची घोषणा केली.

स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलन आणि चषक अनावरण कार्यक्रमाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सच्या अध्यक्षा मनीषा मल्होत्रा आणि तथागत मुखर्जी, ॲक्सिस बँकेचे सईद हैदर तसेच आदित्य गोल्हटकर, भारतीय ज्युदो महासंघाचे निरीक्षक वीरेंद्र वशिष्ठ आणि सहायक सचिव सी एस राजन उपस्थित होते. कार्यक्रमास द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक जीवन शर्मा आणि अर्जुन पुरस्कार विजेते यशपाल सोलंकी, स्पर्धा प्रमुख जे आर राजेश यांसह राज्य ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांनी तर स्पर्धेचे तांत्रिक सचिव दत्ता आफळे यांनी आभार मानले.

हेमावती नागचा सत्कार 
कार्यक्रमात छत्तीसगड राज्यातील अत्यंत दुर्गम परिसरात राहणाऱ्या हेमावती नाग या आदिवासी मुलीने कोणतीही विशेष साधन सुविधा उपलब्ध नसतानाही राष्ट्रीय शालेय आणि राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेमध्ये अनेक पदके पटकावली आणि म्हणून तिला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल तिचा या कार्यक्रमात विशेष सत्कार मंत्री चंद्रकांत दादा यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *