खो-खो विजेत्यांचा क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सन्मान 

  • By admin
  • January 25, 2025
  • 0
  • 38 Views
Spread the love

नवोदित प्रतिभांना घडवण्यासाठी सरकार कटिबद्ध 

नवी दिल्ली : केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी खो-खो विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवल्याबद्दल भारतीय खो-खो संघाच्या पुरुष आणि महिला खेळाडूंशी संवाद साधून त्यांचा सन्मान केला. 

या संघांनी नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. या कार्यक्रमात राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले आणि त्यांच्या समर्पण व चिकाटीची प्रशंसा केली.  
 
खेळाडूंना संबोधित करताना क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, ‘तुमच्या मेहनतीचे, शिस्तीचे आणि क्रीडाप्रेमाचे हे यश आहे. तुम्ही केवळ विजेतेपद मिळवले नाहीतर खो-खो खेळाला जागतिक स्तरावर स्थान मिळवून दिले आहे. सरकार म्हणून स्थानिक क्रीडांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय यशासाठी नवोदित प्रतिभांना घडवण्यासाठी मी सरकार म्हणून कटिबद्ध आहे.’  
 
या संवादादरम्यान राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी खो-खो खेळाचे प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले, ज्यांनी या ऐतिहासिक यशासाठी तयारी केली आहे. मंत्री खडसे यांनी यावेळी खो-खो या महाराष्ट्रात उगम पावलेल्या खेळाला पाठिंबा देण्यासाठी आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा विकास व सन्मान सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाच्या वचनबद्धतेवर भर दिला.खेळाडूंनी या स्पर्धेतील अनुभवांचे कथन केले आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  

या कार्यक्रमाला खो-खो फेडरेशन अध्यक्ष सुधांशु कुमार मित्तल, सरचिटणीस एम एस त्यागी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *