
फॉर्म गवसण्यासाठी संजय बांगर यांच्याकडून घेतल्या टिप्स
नवी दिल्ली : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली तब्बल १२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. विराट कोहली ३० फेब्रुवारीपासून रेल्वेविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसेल. या सामन्यापूर्वी तो मैदानावर घाम गाळताना दिसला. यावेळी विराटसोबत माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर देखील दिसले. त्याचा व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहली फ्लॉप ठरला. कोहलीने पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावून दौऱ्याची सुरुवात केली. तथापि, कोहली हा वेग कायम ठेवू शकला नाही आणि उर्वरित सामन्यांमध्ये धावा काढण्यात अपयशी ठरला. पाच सामन्यांच्या नऊ डावांमध्ये त्याने फक्त १९० धावा केल्या आणि त्याची सरासरी २३.७५ होती.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली हा माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगरसोबत फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. या काळात त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर फलंदाजीचा सराव केला. खरं तर, अलिकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जाण्याने उजव्या हाताच्या फलंदाजाला खूप त्रास झाला होता. तो नऊ डावांमध्ये आठ वेळा अशा चेंडूंवर झेलबाद झाला. आता तो त्याच्या या कमकुवतपणावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी
रणजी सामन्यानंतर विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसेल. त्यानंतर तो चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला जाईल. चाहत्यांना आशा आहे की आगामी स्पर्धेपूर्वी माजी भारतीय कर्णधार त्याच्या फॉर्ममध्ये परतेल.