
भारत-इंग्लंड यांच्यात मंगळवारी तिसरा टी २० सामना
राजकोट : दोन टी २० सामने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी २० सामना राजकोट येथे मंगळवारी (२८ जानेवारी) रंगणार आहे.
निरंजन शाह स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पहिले दोन टी २० सामने भारतीय संघाने जिंकले. त्यामुळे तिसरा टी २० सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी नोंदवत इंग्लंडला रोखण्यात यश मिळवले. भारताचे आघाडीचे फलंदाज अद्याप अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. ही संघ व्यवस्थापनासाठी चिंतेची गोष्ट आहे. संजू सॅमसन, कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याकडून ज्या प्रकारे टी २० सामन्यात अपेक्षित कामगिरी होती ती अद्याप त्यांच्याकडून झालेली नाही. दोन्ही सामन्यात संजू व सूर्यकुमार यादव हे स्वस्तात बाद झाले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी २० सामना मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता खेळला जाईल. पाच सामन्यांच्या टी २० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका ६ ते १२ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील सामने दुपारी १:३० वाजता सुरू होतील. टी २० मालिका जिंकण्याची मोठी संधी भारतीय संघाकडे आहे. इंग्लंड संघ दोन्ही सामन्यात दबावात असल्याचे दिसून आले. खास करुन भारतीय फिरकी गोलंदाजांचा सामना करताना इंग्लंडला चोख उत्तर सापडलेले नाही. टी २० मालिकेतील चौथा टी २० सामना पुणे येथे ३१ जानेवारी रोजी तर पाचवा टी २० सामना मुंबई येथे २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.