खेड शिवापूर येथे प्रथमच आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन 

  • By admin
  • January 28, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

शिवभूमी शिक्षण संस्थेमार्फत २ फेब्रुवारी रोजी आयोजन, दोन लाखांवर पारितोषिके 

पुणे : शिवभूमी शिक्षण संस्थेमार्फत येत्या २ फेब्रुवारी रोजी शिवाजीराव कोंडे स्मृती खुली आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळ मानांकन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा खेड-शिवापूर या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव  राजेंद्र कोंडे यांनी दिली.

खेड शिवापूर येथे शिवराय मंगल कार्यालयात भव्य प्रमाणात ओपन आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेला अखिल भारतीय बद्धिबळ महासंघ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांची मान्यता मिळाली आहे. पी आर चेस वर्ल्ड यांचे तांत्रिक सहकार्य व नियोजन या स्पर्धेला लाभले आहे. या स्पर्धेसाठी एकूण दोन लाख एक रुपये अशी रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तसेच विजेत्यांना एकूण ५४ ट्रॉफीज् व अनेक मेडल्स दिले जाणार आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे यांनी दिली.

या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभत असून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील तसेच बाहेर राज्यातील सुमारे ५०० खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे. तसेच अमेरिका, ईस्त्राईल, झांबिया या देशांतील स्पर्धकही सहभागी होत आहेत. या स्पर्धेत चार इंटरनॅशनल मास्टर्स, चार फिडे मास्टर्स, एक कँडीडेट मास्टर्स यांच्यासह २५० हून अधिक आंतरराष्ट्रीय मानांकन लाभलेल्या खेळाडूंनी नाव नोंदणी केली असल्याची माहिती सचिव राजेंद्र कोंडे यांनी दिली.

खेड शिवापूर या ठिकाणी अशी मानाची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा प्रथमच होत असून देश-विदेशातील अनेक प्रमुख खेळाडू बुद्धिबळ कौशल्य दाखवण्यासाठी येत आहेत, असे सचिव राजेंद्र कोंडे यांनी सांगितले. 

प्रमुख खेळांडूमध्ये फिडे मास्टर सुयोग वाघ, निखिल दीक्षित, कशिष जैन, अनिरूद्ध देशपांडे तर इंटरनॅशनल मास्टर समेध शेटे, समीर कठमाळे, अभिषेक केळकर, रामनाथ बाळसुब्रह्ममण्यम यांच्यासह श्रीराज भोसले, इंद्रजित महिंद्रेकर, केवल निर्गुण, ओम लामकाने, ऋषिकेश कबनुरकर, निहारा कौल, आरूष डोळस, किरण पंडितराव आदी महत्वाचे खेळाडू खेळणार आहेत.

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव राजेंद्र कोंडे हे या स्पर्धेचे स्पर्धा संचालक असून आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी हे स्पर्धा सचिव आहेत. आंतरराष्ट्रीय पंच श्रद्धा विंचवेकर या प्रमुख पंच व आंतरराष्ट्रीय पंच शार्दुल तपासे हे सहाय्यक पंच म्हणून काम बघणार आहेत. तरी या स्पर्धेत खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन सचिव राजेंद्र कोंडे (९८२२३०३५४०) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *