
डेक्कन जिमखाना आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा
पुणे : डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली २४व्या एनइसीसी डेक्कन जिमखाना आयटीएफ ७५ हजार डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत एकेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती, सहजा यमलापल्ली यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत पहिल्या फेरीत भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती हिने अमेरिकेच्या एलाना स्मिथचा ६-१, ६-२ असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली. हा सामना १ तास २० मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये श्रीवल्लीने जोरदार खेळ करत चौथ्या गेममध्ये स्मिथची सर्व्हिस भेदली. या सेटमध्ये आपले वर्चस्व कायम राखत हा सेट ६-१ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये स्मिथने श्रीवल्लीची तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व २-१ अशी आघाडी घेतली. पण ही आघाडी तिला फार काळ टिकवता आली नाही. पुढच्याच गेममध्ये श्रीवल्लीने स्मिथची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर श्रीवल्लीने आपल्या बिनतोड सर्व्हिस व आक्रमक खेळाच्या जोरावर हा सेट स्मिथविरुद्ध ६-२ असा जिंकून विजय मिळवला.
संघर्षपूर्ण लढतीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या सहजा यमलापल्लीने क्वालिफायर जपानच्या नाहो सातोचा टायब्रेकमध्ये ६-७ (४), ६-१, ६-३ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. सहजा हिने सातोचे आव्हान २ तास ३५ मिनिटात मोडीत काढले. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या चीनच्या फॅंग्रेन टीयान हिने भारताच्या वैष्णवी आडकर हिचा ६-३, ६-४ असा पराभव केला. अन्य लढतीत इटलीच्या कॅमिला रोसाटेल्लो हिने चेक प्रजासत्ताकच्या सारा बेजलेकचा ३-६,१-६, ६-४ असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला.
दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या ऋतुजा भोसले हिने ग्रेट ब्रिटनच्या ॲलिसिया बार्नेटच्या साथीत तिसऱ्या मानांकित स्लोव्हाकियाच्या दलिला जाकुपोविक व ब्राझीलच्या लॉरा पिगोस्सीचा ६-७ (५), ६-४, १०-४ असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.