
जळगाव : उदय वेद आणि निलेश आशर यांच्या स्मरणार्थ जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या इंद्रजित महिंद्रकर याने विजेतेपद पटकावले.
आयोजक आरती आशर तसेच जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व श्री गुजराती समाज मित्र मंडळ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मुख्य अतिथी डॉ रणजीत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या खेळाडूंना मुख्य अतिथी राजेश झाल्टे, रोझमीन खिमाणी, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, शोभा उदय वेद, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन खेळाडूंना गौरविण्यात आले.
खुल्या गटात छत्रपती संभाजीनगर येथील इंद्रजीत महिंद्रकर याने ८ पैकी ८ राऊंड जिंकून प्रथम क्रमांक पटकावला. खुल्या गटात एकूण १५ विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे चीफ आर्बिटर प्रवीण ठाकरे व त्यांची टीम यांनी कामकाज बघितले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी व्रजेश वेद, जयेश वेद व देवकीनंदन पांडे यांचे सहकार्य लाभले.