प्रभादेवी येथे आठ फेब्रुवारीपासून कबड्डीचा थरार

  • By admin
  • January 29, 2025
  • 0
  • 29 Views
Spread the love

स्वामी समर्थ क्रीडा मंडळातर्फे आयोजन

मुंबई : गेली आठ दशके प्रभादेवीत कबड्डीचा दम घुमवणार्‍या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने अव्वल १२ व्यावसायिक संघांची संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. येत्या ८ ते ११ फेब्रुवारी दरम्यान विशेष व्यावसायिक पुरूष गट कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने दिग्गज कबड्डीपटूंचा चढाई-पकडींचा थरार कबड्डीप्रेमींना अनुभवता येणार आहे.

कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्यापूर्वी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान आणि सन्मान मिळवून देताना दिमाखदार स्पर्धांचे आयोजन करणार्‍या ८१ वर्षांच्या तरुण तडफदार स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा विशेष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. यंदाही मंडळाच्या विशेष व्यावसायिक स्पर्धेत इन्शुअरकोट स्पोर्ट्स (युवा पलटन), सेंट्रल बँक, मुंबई महानगर पालिका, रिझर्व्ह बँक, मिडलाईन अ‍ॅकॅडमी, एमपीएमसी पुणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट अशा बलाढ्य संघांचा दमदार खेळ चवन्नी गल्लीत उभारलेल्या क्रीडानगरीत एका मॅटच्या मैदानावर पाहण्याची संधी मिळणार आहे.

विजेत्याला लक्षाधीश करणार

कबड्डी संघ आणि कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून या स्पर्धेत विजेत्या संघाला लाखमोलाचे म्हणजे १,११,१११ रुपयांचे रोख इनाम दिले जाणार असल्याची माहिती आमदार आणि मंडळाचे प्रमुख कार्यवाह महेश सावंत यांनी दिली.  तसेच उपविजेत्या संघालाही ८० हजार रुपये आणि चषक दिला जाणार आहे. एवढेच नव्हे तर उपांत्य सामन्यात पराभूत झालेल्या संघांनाही रोख इनाम देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती आमदार सावंत यांनी दिली. स्पर्धेत एकंदर १२ बलाढ्य संघ खेळणार असून तीन-तीन संघांचे चार गट खेळविले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी एकमेकांशी भिडतील. स्पर्धा अधिक रंजक आणि थरारक व्हावी म्हणून एकाच मॅटवर खेळविली जाणार असून प्रत्येक दिवशी पाच सामने खेळविले जाणार असल्याची माहिती मंडळाचे क्रीडा प्रमुख रवी शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *