
अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज
गॅले : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने १० हजार कसोटी धावांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात स्मिथ याने हा ऐतिहासिक टप्पा गाठला.
या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. पहिला कसोटी सामना गॅले येथील गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात स्मिथने १०,००० धावांचा टप्पा ओलांडला. स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीपेक्षा कमी डाव खेळून हा विक्रम केला, तर विराट कोहली अजूनही या विक्रमापासून खूप दूर आहे.
श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीला येण्यापूर्वी स्मिथने ९,९९९ कसोटी धावा केल्या होत्या. त्याला १० हजारांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी फक्त ०१ धावांची आवश्यकता होती. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना, स्मिथने त्याच्या डावाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन हा टप्पा गाठला.
स्टीव्ह स्मिथने ११५ कसोटी सामन्यांच्या २०५ डावांमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारताच्या विराट कोहलीने आतापर्यंत १२३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये कोहलीने २१० डावांमध्ये ९२३० धावा केल्या आहेत. अशाप्रकारे, जास्त डाव खेळूनही कोहलीने कसोटीत स्मिथपेक्षा कमी धावा केल्या आहेत.
स्मिथ १५ वा फलंदाज आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडणारा स्मिथ जगातील १५ वा फलंदाज बनला आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत १५,९२१ कसोटी धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाकडून १०,००० कसोटी धावांचा टप्पा ओलांडणारा स्मिथ चौथा फलंदाज ठरला. स्मिथच्या आधी, अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉन्टिंग यांनी ऑस्ट्रेलियासाठी १०,००० कसोटी धावांचा टप्पा गाठला होता.