
नवी दिल्ली : टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशचा प्रभावी फॉर्म सुरूच आहे. गुकेश याने या स्पर्धेत आघाडी घेतली आहे.
‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’चे विजेतेपद जिंकणाऱ्या गुकेश याने नवव्या फेरीत त्याचा प्रतिस्पर्धी लिओन ल्यूक मेंडोन्साला पराभूत करून एकमेव आघाडी घेतली. गुकेशचे आता नऊ पैकी ६.५ गुण आहेत आणि तो उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह आणि फेडोसेव्हपेक्षा अर्धा गुणांनी पुढे आहे.
सामन्यानंतर गुकेश म्हणाला की, ‘आज मी चांगला खेळू शकलो याचा मला आनंद आहे. अजून चार फेऱ्या बाकी आहेत आणि मी टेबलबद्दल जास्त विचार करत नाही. मी माझ्या खेळावर खूश आहे.’
दरम्यान, भारताचा दुसरा खेळाडू आर प्रज्ञानंदाचा नेदरलँड्सचा ग्रँडमास्टर अनिश गिरीने पराभव केला, तर पी हरिकृष्णाचा रशियात जन्मलेल्या स्लोव्हेनियन खेळाडू व्लादिमीर फेडोसेव्हने पराभव केला. प्रज्ञानंद ५.५ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.