
ऋषभ, मिहीरला रौप्य, अदिती, ओमला कांस्य, रिले शर्यतीत रूपेरी कामगिरी
हल्दवानी : उत्तराखंडात सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जलतरणात महाराष्ट्राने बुधवारी पदकांचा चौकार झळकावला. २ रौप्य व २ कांस्य पदके जिंकून महाराष्ट्राने दिवस गाजविला.
पुरुषांच्या गटात ऋषभ दास व मिहीर आम्ब्रे यांनी प्रत्येकी एक रौप्य पदक पटकाविले. मुलींच्या रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्य पदक तर आदिती हेगडे हिने एक कांस्यपदकाची कमाई केली. सोलापूरच्या ओम अवस्थी याने दहा मीटर प्लॅटफॉर्म डायव्हिंग प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

इंदिरा गांधी जलतरण तलावावर पुण्याच्या मिहिर आम्ब्रेने पुरुषांच्या १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात तर नवी मुंबईच्या ऋषभ दास याने दोनशे मीटर फ्रीस्टाइल प्रकारात रौप्य पदक पटकावले. नाशिकच्या अदिती हेगडे हिने महिलांच्या २०० मीटर फ्री स्टाइल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

नवी मुंबईच्या ऋषभ दास याने दोनशे मीटर फ्रीस्टाइल क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकले. त्याला हे अंतर पार करण्यास एक मिनिट ५४.६१ सेकंद वेळ लागला. आसामच्या पेगु तीर्थंका याने हेच अंतर एक मिनिट ५५ सेकंदात पार करीत सोनेरी कामगिरी केली. मिहीर आम्ब्रे या महाराष्ट्राच्या खेळाडूने १०० मीटर्स बटरफ्लाय क्रीडा प्रकारात रुपेरी यश संपादन केले. त्याला ही शर्यत पार करण्यासाठी ५४.२४ सेकंद वेळ लागला.
मुलींच्या चार बाय शंभर मीटर फ्रीस्टाइल रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्य पदक मिळाले. अवंतिका चव्हाण अन्वी देशवाल, सान्वी देशवाल व अदिती हेगडे यांनी हे अंतर चार मिनिटे २.१७ सेकंदात पार केले.
महाराष्ट्राच्या अदिती हेगडे हिने २०० मीटर्स क्रीडा प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली तिला हे अंतर पार करण्यास दोन मिनिटे ९.५३ सेकंद वेळ लागला. कर्नाटकची देसिंधु धिनिधी (दोन मिनिटे ३.२४ सेकंद) व दिल्लीची भाव्या सचदेव (दोन मिनिटे ८.६८ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकाचा मान मिळविला.
ओम अवस्थीने अप्रतिम कौशल्य दाखवीत दहा मीटर प्लॅटफॉर्म डायव्हिंग प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.