
पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करुन शाळेचा सन्मान
सातारा (नीलम पवार) : सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा या शाळेस शाहू स्टेडियम येथे ४१ हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
पोदार इंटरनॅशनल स्कूल ही शाळा गुणवत्ते बरोबर विद्यार्थ्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यास नेहमी सज्ज असते. गुणवत्ते बरोबर कला, क्रीडा या क्षेत्रात नेहमीच एक पाऊल पुढे असते. याची प्रचिती म्हणजेच प्रजासत्ताक दिन दिवशी सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने शाळेस धनादेश देण्यात आला. पालकमंत्री शंभूराजे देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, सीईओ याशनी नागराजन, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या हस्ते पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुनील सिंह रावत यांच्याकडे ४१ हजार ७७० रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. खेळाडूंच्या अंगी असलेले कौशल्य दाखवण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल. स्पर्धेत खेळाडूंचा सहभाग वाढेल. यादृष्टीने प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, क्रिकेटमध्ये खेळाडूंनी राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, खेलो इंडिया यासारख्या विविध स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा धनादेश प्राप्त झाला. याबद्दल प्राचार्य सुनील सिंह रावत यांनी क्रीडा विभागातील चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले अशीच अभिमानास्पद कामगिरी यापुढेही करत रहाल याविषयी खात्री व्यक्त करून विद्यार्थ्यांना आणखी कसोशीने मेहनत करण्याचे मार्गदर्शनही त्यांनी केले.
त्याचबरोबर शाळेतील सर्व क्रीडा शिक्षक अजिंक्य लाड, अनुप हिंगमिरे, प्रज्ञा शिंदे, प्रदीप शेळके, वर्षा लाड यांनी शाळेमध्ये विविध खेळांचा विद्यार्थ्यांकडून नियमित सराव करून घेतला. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपप्राचार्या प्राजक्ती गायकवाड यांनी खेळाडूंच्या मेहनतीचे आणि शिक्षकांनी घेतलेल्या सरावा बाबतची प्रशंसा केली. वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थापक मनोज जाधव, प्रशासकीय व्यवस्थापक केदार गोखले यांनी खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांचे विशेष आभार मानले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी याबाबत आनंद व्यक्त केला.