गुरुकुल स्कूलला ६२ हजारांचा रोख पुरस्कार

  • By admin
  • January 30, 2025
  • 0
  • 24 Views
Spread the love

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते गौरव

सातारा (नीलम पवार) : सातारा गोडोली शाहूनगर येथील इंग्रजी माध्यमाच्या गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम गुरूकुल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमाबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, खेळ यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येतात.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे शालेय क्रीडा स्पर्धेतील शाळा व महाविद्यालयातील खेळाडूंचा सहभाग वाढावा या दृष्टीकोनातून शासन निर्णयान्वये क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन गुणानुक्रमे प्राविण्यप्राप्त शाळांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना कार्यान्वित आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यानी शालेय क्रीडा स्पर्धामध्ये विविध क्रीडा प्रकारात जिल्हास्तरापासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत दैदिप्यमान कामगिरी करत उज्वल यश संपादन केले होते व विविध क्रीडा प्रकारांमध्ये पदकेही मिळविली. या अनुषंगाने १४ वर्षांखालील वयोगटामध्ये गुरूकुल स्कूलने द्वितीय क्रमांक संपादन केला. याबद्दल प्रजासत्ताक दिनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी ६२ हजार ६५५ रुपयांचा प्रोत्साहन अनुदानाचा धनादेश देवून शाळेला सन्मानित करून गौरव करण्यात आला.

सदर प्रोत्साहन अनुदानाचा धनादेश माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ व प्री प्रायमरी इनचार्ज ऐश्वर्या चोरगे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर उपस्थित होते.

गुरूकुल स्कूलला महाराष्ट्र शासनाच्यावतीने खेळामध्ये प्राविण्य प्राप्त शाळा म्हणून गौरविल्याबद्दल शाळेतील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव आनंद गुरव, अर्जुन चोरगे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक शिक्षक संघ, विद्यार्थी यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *