
पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा टी २० सामना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारी रंगणार आहे. भारतीय संघ २-१ ने आघाडीवर असला तरी चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्नात भारतीय संघ असेल. इंग्लंडने तिसरा टी २० सामना जिंकून मालिकेत चुरस निर्माण केली आहे.
पुणे येथे होणारा टी २० सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी वेगळा असणार आहे. भारतीय संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार तर इंग्लंड संघ मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. इंग्लंडने तिसरा सामना जिंकून भारतीय संघाला मोठा इशारा दिला आहे.
या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी भारतीय दिग्गज फलंदाजांना अद्याप अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. साहजिकच गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापन समोर भारतीय फलंदाजी ही चिंतेची गोष्ट बनली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म सध्या हरवलेला दिसून येत आहे. खराब फटके मारुन तो बाद झाला आहे. संजू सॅमसन उसळत्या चेंडूंचा बळी ठरत आहे.
अभिषेक शर्मा व तिलक वर्मा यांनी आतापर्यंत चांगले योगदान दिले असे म्हणावे लागेल. १४ महिन्यानंतर भारतीय संघात परतलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने तिसऱ्या टी २० सामन्यात तीन षटके गोलंदाजी केली. शमीला एकही विकेट मिळाली नाही. या सामन्यात शमीच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असेल. ध्रुव जुरेलने आतापर्यंत अपेक्षित कामगिरी केलेली नाही. त्याच्या जागी शिवम दुबे या अष्टपैलू खेळाडूस संधी दिली जाऊ शकते. रिंकू सिंह दुखापतग्रस्त असल्याने भारताच्या फलंदाजी थोडी कमकुवत झाली आहे.
भारतीय वेळेनुसार चौथा टी २० सामना शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता सुरू होईल.