
मुंबई : प्रेस एनक्लेव्हतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटात समर चव्हाण याने विजेतेपद पटकावले.
सायन प्रतिक्षानगर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण पाच फेऱ्यात समरने एक सामना अनिर्णित राखत साडेचार गुणांची कमाई केली होती. पण अमोघ शर्माने तितक्याच गुणांची कमाई केल्याने टाय ब्रेक झाला. यावेळी सरस गुणगतीच्या आधारे विजेतेपदाचा निर्णय घेण्यात आला. त्यात १३.२५ विरुद्ध १२.७५ अशा अवघ्या ०.५० फरकाच्या गुणांनी समर चव्हाण याने बाजी मारली. अमोघला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर चार गुणांसहीत अदिश गावडे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.
विजेत्या समर चव्हाण याला सदानंद चव्हाण यांच्या स्मरणार्थ अडीच हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तर अमोघ शर्माला नंदकुमार जांभेकर यांच्या स्मरणार्थ दीड हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तृतीय क्रमांकावरील आदिश गावडे याला सुमित्रा राजाराम पराडे यांच्या स्मरणार्थ एक हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.
स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू म्हणून युवान तावडे या खेळाडूला यावेळी सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक राजन पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संयोजकल शरद पाठक आणि गणेश गावडे उपस्थित होते.