
आदित्य राणेची चमकदार कामगिरी
मुंबई : द यंग कॉम्रेड्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत युनायटेड क्रिकेटर्स संघाला पारसी जिमखान्याविरुद्ध ८१ धावांनी पराभूत व्हावे लागले. मात्र, मध्यमगती स्विंग गोलंदाज आदित्य राणेने ७ विकेट घेत आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली.
प्रथम फलंदाजी करताना पारसी जिमखाना संघाने जय जैनच्या झंझावाती शतकाच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली. जय जैनने ९७ चेंडूंमध्ये ११८ धावा फटकावत संघाचा पाया रचला. त्याला सचिन यादवने ४६ चेंडूत ५० धावा आणि इशान मुलचंदानीने ४६ चेंडूत ३५ धावांचे योगदान दिले. युनायटेड क्रिकेटर्ससाठी आदित्य राणेने प्रभावी गोलंदाजी करत २२.३ षटकांत ८७ धावांत ७ विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात युनायटेड क्रिकेटर्सला हे आव्हान पेलता आले नाही. ओंकार रहाटे (५०), सुचित देवली (५१) आणि आदित्य सुळे (३२) यांनी संघाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. आदित्य राणेनेही फलंदाजीत चमकदार कामगिरी करत २८ चेंडूत वेगवान ३० धावा फटकावल्या. मात्र, अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने संघाला पराभव स्वीकारावा लागला.
पारसी जिमखान्यासाठी सागर छाब्रियाने ३ आणि नूतन गोयलने ४ महत्त्वपूर्ण विकेट घेत विजय सुलभ केला.