वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राचा पदकांचा षटकार, ४ रौप्य, २ कांस्य

  • By admin
  • January 30, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

संकेत, दीपाली, सारिका, मुकुंदला रौप्य तर आकाश, शुभमला कांस्य

डेहराडून :)उत्तराखंडातील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ग्रामीण भागातील ध्येयवादी खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्रासाठी ६ पदकांची लयलुट केली. सांगलीचा राष्ट्रकुल पदक विजेता संकेत सरगर, सांगलीची दीपाली गुरसाळे, पुण्याच्या सारिका शिनगारे व नाशिकच्या मुकुंद आहेर यांनी रौप्यपदक पटकावले. लातूरच्या आकाश गौड व पुण्याचा शुभम तोडकर यांनी कांस्य पदकाची कमाई केली.

पंधरा दिवसांपूर्वी गुडघ्याला व स्नायूला मोठ्या प्रमाणात दुखापती होऊनही सांगली जिल्ह्याची खेळाडू दीपाली गुरसाळे हिने या दुखापतीवर मानसिक तंदुरुस्ती भक्कम ठेवीत मात करीत वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य पदक पटकाविले. दीपाली हिने ४५ किलो गटातील स्नॅचमध्ये ६९ किलो तर क्लीन व जर्क मध्ये ८२ किलो असे एकूण १५१ किलो वचन उचलले. केरळच्या सुफना जस्मिन हिने अनुक्रमे ७२ व ८७ असे एकूण १५९ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले.

पुरुषांच्या ६१ किलो गटात महाराष्ट्राच्या सांगलीचा राष्टकुल पदक विजेता संकेत सरगर याने स्नॅच मध्ये ११७ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १४२ किलो असे एकूण २५९ किलो वजन उचलले आणि रौप्य पदक जिंकले. त्याचा सहकारी पुण्याचा शुभम तोडकर याने कांस्यपदक पटकाविले. त्याने स्नॅच मध्ये ११४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १४० किलो असे एकूण २५४ किलो वजन उचलले.

पुरुष गटातील ५५ किलो गटात महाराष्ट्राच्या मुकुंद आहेर व आकाश गौड यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली. मुकुंद आहेर याने स्नॅच मध्ये ११२ किलो वजन तर क्लीन व जर्कमध्ये १३५ असे एकूण २४७ किलो वजन उचलले. आकाश गौड याने मध्ये १०७ किलो वजन तर क्लीन व जर्कमध्ये १३७ असे एकूण २४४ किलो वजन उचलले.

पुण्याजवळील राजगुरूनगर मधील सारिका शिनगारे हिने महिलांच्या ४९ किलो गटात रुपेरी यश संपादन केले तिने स्नॅचमध्ये ७९ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १०० असे एकूण १७९ किलो वजन उचलले. छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादव हिने अनुक्रमे ८५ व १०६ असे एकूण १९१ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. २६ वर्षीय सारिका रेल्वेची खेळाडू असून पुण्यातील वडगाव मावळ येथे अनिकेत निवघणे यांच्याकडून प्रशिक्षण घेते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *